धुळे शहर
रहदारीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने टपर्या, लोटगाड्या लावून व्यवसाय करणार्यांमुळे देवपुरात एका निरपराध धुळेकराचा नाहक बळी गेला. त्यानंतर प्रशासन जागे झाले असून काल आग्रारोड साफ केल्यानंतर आज महापालिका आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिम संतोषी माता मंदिर परिसर आणि साक्रीरोडवर राबवली जात आहे.
अतिक्रमण हटाव पथकाने हॉकर्सचे साहित्य जप्त करुन मोठी कारवाई केली आहे. साक्रीरोडवर रस्त्यालगत अतिक्रमणात व्यवसाय करणार्यांना प्रशासनाने कालच इशारा दिला होता, त्यानंतरही रस्त्यावर कच्चे शेड उभारणे, टपर्या ठेवणार्यांवर अतिक्रमण हटावच्या कारवाईचा बडगा उगारला गेला. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर विभागाचे उपअभियंता डी.बी.झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपासह बांधकाम विभागाने केली. यावेळी अनेक टपर्या जप्तही केल्या गेल्या. तसेच शेड काढून टाकले. यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रसाद जाधव यांनी दिली.