आमदार अनुपभैय्या अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन
प्रत्येक नागरीकाने दररोज शारिरीक व्यायाम व योगा करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन
धुळे जिल्हा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील पोलीस कवायत मैदानावर आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर, २०१४ च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो.

या दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात आज पोलीस कवायत मैदानावर सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, महापालिका अप्पर आयुक्त करुणा डहाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजन समितीचे ओमभैय्या खंडेलवाल, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, एनसीसीचे कर्नल एस. के. गुप्ता, ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या गीता दीदी, राजेश वाणी, अध्यक्ष, भारत विकास परिषद, सुधाकर बेंद्रे, गायत्री परिवार यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर, लोक्रतिनिधी, योग अभ्यासक, योगाचार्य, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अनुपभैय्या अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतांना म्हणाले की, शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत आसनांचे खुप महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकाने आजपासून दररोज शारिरीक व्यायाम व योगा करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही सर्व धुळेकरांना केले. यावेळी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजन समितीचे ओमभैय्या खंडेलवाल यांनीही मार्गदर्शन केले.
यानंतर प्रशिक्षित योगा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ओमकार व प्रार्थना, पुरक हालचाली, खांद्यांची हालचाल, कमरेच्या हालचाली, पायाच्या हालचाली, योगासने यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील आसने यात भ्रदासन, बद्धकोनासन, बटरफ्लाय, वज्रासन, उत्तान मंडूकासन, वक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने यात भुजंगासन, शलभासन, मकारासन, पाठीवर झोपून करावयाचे आसने यात सेतुबंधासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायमात नाडीशोधन प्राणायाम, शितली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान व ओमकार व समापन याप्रमाणे सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केलेत. या आंतरराष्ट्रीय योगदिनात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, योग साधक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.