धुळे जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक संपन्न
धुळे जिल्हा
धुळे औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात आज जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डिंगबर पारधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप अभियंता एस. ए. पाटील, अभियंता दिनेश अग्रवाल, राज्यकर सहायक आयुक्त एस. एस. वळवी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. के. शर्मा, मित्रा तसेच महास्ट्राइडचे सहयोगी भागीदार प्रितम मोहन सिंग, शामल अग्रवत, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता केंद्राचे चं. सु. दुसाने, खान्देश औद्योगिक विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग, भरत अग्रवाल, नितीन देवरे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष वर्धमान सिंगवी, प्रशांत देवरे यांच्यासह विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, एमआयडीसी परीसरातील अतिक्रमण हटविणे, एमआयडीसी क्षेत्रासाठी 33 के.व्ही विद्युत केंद्र उभारणी करणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, नरडाणा ग्रोथ सेंटर मधील उद्योगांच्या अडचणी, एस.बी.आय. एमआयडीसी शाखा येथील 50 लाखाच्या आतील कर्ज प्रकरणे, इ. मुद्यांचा समावेश होता. संबंधित यंत्रणांनी या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विसपुते यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीतून कामे करण्यासाठी उद्योजकांनी आपले अभिप्राय देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महास्ट्राइडचे सहयोगी भागीदार श्री. सिंग म्हणाले की, जिल्ह्यात कृषी, उद्योग, वस्त्रोद्योग, सोलर, पर्यटन यासारख्या क्षेत्रात प्रचंड संधी असून त्या क्षेत्रातील उद्योजकांनी यावर भर देण्याचे सुचविले. यावेळी त्यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजकांनी बैठकीत आपल्या अडचणींबरोबरच काही महत्वपूर्ण सुचनाही केल्यात.