“आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार थांबवा” म्हणत साधला निशाणा
धुळे शहर
शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल होणार असून, त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करत विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडून धुळेकर नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. केंद्राकडून अशी कुठलीच मंजुरी मिळालेली नसून, खासदारांकडून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे.
आमदार अग्रवाल म्हणाले, की शहरातील वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीसह मंजुरी दिल्याचे दिशाभूल करणारे वृत्त खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रसारमाध्यमांना देऊन आज तशी आत्मस्तुती करणारी प्रसिद्धी पदरात पाडून घेतली. वास्तविक, पांझरा नदीवरील ब्रिटिशकालीन लहान पुलाच्या ठिकाणी मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ च्या अर्थसंकल्पात ९ कोटी रुपयांची निधी मंजूर आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळ (पूल) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सध्या अस्तित्वात असलेल्या धुळे शहरातील लहान पुलाची पाहणी करून परीक्षण करण्यात आले आहे. त्यात त्यांनी ब्रिटिशकालन उत्कृष्ट नमुने रिट्रोफिटिंग करून जतन केले पाहिजेत असे निरीक्षण मांडले असून, त्यानुसार पुलाचे सविस्तर संरचनात्मक परीक्षणही करण्यात आले. त्याबाबतच्या अहवालात हा पूल हलक्या वाहतुकीसाठी सुरक्षित असून, तो पाडू नये. वेळोवेळी देखभाल व देखरेख केल्यास हा पूल अधिक काळासाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य राहील आणि तोडून नवीन बांधकाम करण्याची सध्या आवश्यकता नाही, असे निष्कर्ष मांडले आहेत. तसेच सध्या अस्तित्वातील लहान पुलाचा वापर कायम ठेवण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. याबाबत २८ डिसेंबर २०२४ ला महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मी स्वतः केलेल्या पाहणीवेळी काही सूचनाही केल्या असल्याचे आमदार अग्रवाल यांनी नमूद केले.
आमदार अग्रवाल म्हणाले, की या अहवालानंतर मी मंजूर ९ कोटींच्या निधीतून पांझरा नदीवर सावरकर पुतळ्याला लागूनच दुसऱ्या ठिकाणी पूल बांधण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या २२ जुलै २०२५ ला, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना १७ फेब्रुवारी २०२५ व २२ जुलै २०२५ ला, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना १७ एप्रिल २०२५ ला पत्रासह निवेदन देऊन नवीन पूल कम बंधारा बांधण्यास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यासाठी अंडाकृती बगीचा-सावरकर पुतळा-लहान पूल- श्री स्वामी समर्थ केंद्र ते गांधी पुतळ्यापर्यंतचा महापालिकेच्या अखत्यारित असलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठरावही मंजूर आहे. त्यानुसार सावरकर पुतळ्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल बांधण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूही आहे. पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्पांतर्गत पांझरा नदी सुधारणा कार्यक्रमात पूल कम बंधारा असे या कामाचे नियोजन आहे. त्यासाठी मी सर्वेक्षण प्रस्तावही तयार केला असून, मंजुरीसाठी शासनाकडे दिला आहे. लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळून सध्या अस्तित्वात असलेला लहान पूल कायम ठेवून सावरकर पुतळ्यालगतच मंजूर ९ कोटींच्या निधीतून नव्याने पूल कम बंधारा बांधण्यात येणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले
आयत्या पिठावर रेघोट्या मारू नयेत
यामुळे खासदार डॉ. बच्छाव यांनी कुठल्याही कामाचे श्रेय घेताना किमान चार वेळा विचार करावा. त्यांनी स्वतः केंद्रासह राज्य शासनाकडून धुळे शहरातील विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणावा आणि मग श्रेयाची शेखी मिरवावी, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे प्रकार थांबवावेत, असा टोलाही आमदार अग्रवाल यांनी लगावला. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २८ जुलै २०२५ ला नवीन पुलाच्या बांधकामाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत मला पत्र दिले असून, त्यात लहान पुलाचे झालेले परीक्षण, सर्वेक्षण संदर्भासह सर्व अहवालही सोबत जोडले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.