राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई
राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यात धुळे जिल्हा परिषदेत नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद राखीव ठेवलं आहे. त्यामुळे यंदाचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर महिला विराजमान होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात आधी प्रारून गट रचना झाली आणि आता अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
त्यानुसार परभणीआणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील तर चंद्रपूर, बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहील.
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि नंदुरबार जिल्हापरिषदेचं अध्यक्षपद आरक्षित झालं असून अकोला, वाशिम, आणि अहिल्यानगर इथं अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी अध्यक्षपद राखीव असेल. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोलापूर, हिंगोली आणि भंडारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव असेल. नांदेड,जालना, सातारा, धुळे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद राखीव ठेवलं आहे. ठाणे, सांगली, कोल्हापूर,धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी आरक्षित झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे,जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग, आणि रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे.