धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे तालुका पोलिसांनी आतिक रफिक शेख नामक इसमाला गावठी पिस्तुलासह रंगेहाथ पकडून ३७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. काल मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला इसम बेकायदेशीरपणे विना परवाना देशी बनावटीची एक पिस्तोल बाळगून आर्वी गावाकडून मालेगावकडे जाणार आहे. त्यावरुन पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी वरीष्ठांना माहिती देत त्यांच्या मार्गदशर्नात रात्र गस्तीवरील पथकास माहिती देत स्वतंत्र पथक तयार करुन मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळील भारत पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी केली.
यावेळी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास संशयीत इसम दिसला, त्याला हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्याला पोलिसांनी पकडले. त्याची विचारपूस केली असता आतिक रफिक शेख (वय २७) रा.इंदीरा नगर, नवगजी पार्क, वैजापूर जि.संभाजीनगर अशी ओळख दिली. त्याच्या अंग झडतीत ३५ हजाराची एक गावठी बनावटीची पिस्तुल आणि २ हजाराच्या दोन काडतूस असा एकुण ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो कॉ. रविंद्र भिमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पेालिस अधिकारी संजय बंबाळे यंाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, आर्वी दूरक्षेत्र येथील पोलिस हवा. चेतन कंखरे, सुमित ठाकूर, सुरेंद्र खांडेकर, पो कॉ. कुणाल शिंगाणे, रविंद्र सोनवणे, मेहंद्रसिंग गिरासे, कांतीलाल शिरसाठ यांनी केली.