लग्न लावून फसवणूक करणारी टोळी धुळे पोलिसांनी पकडली ; पळालेल्या नवरीसह नागपूरच्या चार जणांना केली अटक 

धुळे

लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील एका मध्यस्थी पुरुष, नववधू आणि उपवर वधूसह चार जणांच्या टोळीस पोलिसांनी अटक केली.चौघाविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या आरोखाली गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन नरेश मरगडे रा.अंगझरी नागपूर,काजल हितेश बारोट (वय २३ वर्षे) रा.शिरोही (राजस्थान),नेहा नरेंद्र मेटकर (वय ३३ वर्षे) रा. गांधीबाग सीताबर्डी,नागपूर व पूनम श्रावणजी येती (वय ३३ वर्षे) रा.शांती नगर नागपूर अशी संशयितांची नावे आहेत.
संशयित सचिन मरगडे हा मध्यस्थी (एजन्ट) तर नेहा मेटकर ही नववधू काजल हिची बहिणी म्हणून आली होती.पूनम येती हीस लग्न लावून देण्यासाठी आणण्यात आले होते.पैकी काजल हिचे माहेरचे नाव काजल अजय भलानी असे असून ती विवाहित आणि एका मुलाची आई असल्याचे कळते.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी-तुषार रमेश खैरनार (वय-३५ वर्ष) रा.धुळे या संगणक चालकाला विवाह करायचा असल्याने वधू शोधणे सुरु होते.दरम्यान, तुषारच्या आईला वधू शोधून देणाऱ्या नागपूर येथील व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळाला.वर आणि वधू पक्षात २१ ऑगष्ट २०२५ रोजी संपर्क झाल्यावर मध्यस्थी व्यक्ती,उपवर वधू आणि तिची बहिण असे तिघे तुषार खैरनार यांच्या घरी आले.मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यस्थाने लग्न लावून देण्यासाठी दीड लाखाची मागणी केली.यावेळी मध्यस्थी आणि नववधूच्या बहिणीसाठी तुषार खैरनार याच्या कुटुंबाने एक लाख तीस हजार रुपये रोख आणि काही रक्कम ऑनलाईन पदतीने दिली.यानंतर तुषारचा विवाह काजल (वय-२० वर्ष) या मुलीशी देवपुर धुळे येथील आदीशक्ती श्री.एकविरा मंदीरात लावून देण्यात आला.लग्न झाल्यावर केवळ दोनच दिवसात तुषारला त्याची पत्नी काजल हिचे वागणे संशयास्पद वाटले आणि त्याने तिच्या आधारकार्डची पडताळणी केली. यावरून काजल ही मूळची राजस्थान येथील असल्याचे प्रथमदर्शी उघड झाले.यानंतर तुषार याने काजल हिचा इन्स्टाग्राम आय.डी चेक केला असता त्यावर काजल हिच्या गळयात मंगळसूत्र व जवळ लहान मुलगा असल्याचे दिसले. यामुळे तुषारचा संशय अधिकच बळावला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.घरातील लोकांना विश्वासात घेवून तुषार खैरनार याने ही सगळी माहिती त्यांना सांगितली.

तुषार खैरनार याच्या कुटुंबियांनी पुन्हा एका मुलाशी लग्न लावण्यासाठी मुलगी दाखवा अशी मागणी संबंधित मध्यस्थी माणसाकडे केली.त्याने उज्जैन येथील पूनम नावाच्या मुलीला आणले आणि मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यावर या लग्नासाठी दीड लाखाची मागणी केली.
या घटनेनंतर आपणास फसविण्यात आले आहे याची जाणीव तुषार खैरनार आणि त्याच्या कुटुंबाला झाली आणि त्यांनी एक सप्टेंबर रोजी सकाळीच चाळीसगाव रोड पोलिसांशी संपर्क साधला व आपबीती कथन केली.
पोलिसांनी याप्रकरणी तुषार खैरनार याच्याकडून तक्रार अर्ज घेतला आणि फिर्याद नोंदवून घेत विवाह लावून देण्यासाठी वधु (मुलगी) उपलब्ध करून देणारा मध्यस्थी सचिन मरगडे,काजल काजल हिची बहीण असल्याचे सांगून संपर्कात आलेली नेहा,व उज्जैन येथील नव वधू म्हणून आलेली मुलगी पुनम यांना बोलावून घेतले आणि
खैरनार कुटुंबाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चारही जणांना ताब्यात घेतले.चौघा संशयितांविरुद्ध पोलिसांनी फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली झाली.
कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्यासह हरिश्चंद्र पाटील,निलेश चव्हाण,विनोद पाठक,शोएब बेग,अतिक शेख,सचिन पाटील,पंकज वाघ,माधुर हाटकर व सोनाली हटकर यांनी केली.

सध्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिमुळे अनेक गावातील मुलांचे लग्न होत नाहीयेत,ही वस्तुस्थिती असून यामुळे अनेक मुलांचे वय वाढते आणि एकप्रकारे मानसिक दबाव निर्माण होतो.याचा गैरफायदा घेत फसवणुकीचे प्रकार वाढतात आणि काही टोळ्या सक्रीय होतात. अशाच घटनांपैकी ही एक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी मात्र असे कृत्य केल्याच्या संशयाखाली चौघांची टोळीच ताब्यात घेवून या घटनेचा पर्दाफाश केला आहे. चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

-श्रीकांत धिवरे
जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे.
=========

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *