धुळे पोलिसांच्या हाती लागले एमडी ड्रग्स तस्कर, १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; दोघांना अटक , ग्राहकांचा घेतला जाणार शोध
धुळे जिल्हा
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरात प्रथमच एमडी ड्रग सदृश्य अंमली पदार्थासह दोघांना अटक केली आहे. १० लाखाचे ड्रग्ससह एकुण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळ्यात अशाप्रकारचे महागडे नशेचे अंमली पदार्थ पहिल्यांदाच आढळून आल्याने यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील सुरत-नागपूर बायपास रोडवरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ काल रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका कारमधून आलेल्या मालेगाव आणि राजस्थान येथील दोन संशयीतांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १०४ ग्रॅम वजनाची पांंढर्या रंगाची पावडर स्वरुपातील अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही पावडर मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज असल्याची कबुली पकडलेल्या सैय्यद अतिक सैय्यद रा.मालेगाव आणि मजहर खान युसूफ खान रा.राजस्थान यांनी दिली. हा अंमली पदार्थ, वाहन आणि मोबाईल असा एकुण १७ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे सारख्या शहरात एमडी सारखे महागडे आणि उच्चभ्रू ड्रग नेमके कोणासाठी आणण्यात येत होते याचा तपास गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकार्यांनी सुरु केला आहे.
एलसीबीने ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींनी यापुर्वी धुळ्यात येवून अनेकदा एमडी ड्रग्जची विक्री केली असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. सदर ड्रग्जचा वापर हा विशेषतः उच्चभ्रु लोकांच्या पार्टीमध्ये केला जातो. तरी एमडी ड्रग्ज धुळे शहरातील व जिल्ह्यातील कोणाकडे विक्रीसाठी जात होता? या ड्रग्जचे शौकीन कोण? या ड्रग्जचे खरेदीदार कोण आहेत? याचा तपास सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.