धुळे शहरात खासगी रुग्णालयावर छापा संशयास्पद गर्भपाताचे प्रकार चौकशीत उघड

धुळे जिल्हा

धुळे शहरातील साक्री रस्त्यावर असलेल्या सुमन हॉस्पिटल या खासगी रुग्णालयातील गर्भपात केंद्रावर आज सकाळी अचानक छापा घालून वैद्यकिय चौकशी पथकाने तपासणी केली. यावेळी दोन महिला रुग्ण आढळल्या तर डॉक्टर सोनल वानखेडे यांची अनुपस्थित असल्याचे आढळले. यावेळी केलेल्या तपासणीत रुग्णांच्या दैनदिन नोंद वही आणि अन्य आक्षेपार्ह कागदपत्रे आणि औषधे पथकाच्या हाती लागले आहेत. यामुळे शहरातील वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत धुळे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर योग्य रहावा यासाठी गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायद्याचे योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील संशयास्पद गर्भलिंग चाचणी व गर्भपात केंद्रे व सोनोग्राफी सेंटर यांची अचानक तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या अनुषंगाने आज महानगर पालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, नायब तहसिलदार अविनाश सोनकांबळे, जिल्हा विधी सल्लागार ऍड. मिरा माळी व सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत गोंधळी, पो. कॉ. मोनाली पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यासंदर्भात डॉ. संपदा कुलकर्णी म्हणाल्या, शासनाच्या आमची मुलगी वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार आज धुळ्यातील साक्रीरोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये २० आठवडया पयर्ंतचे गर्भपात करण्यास शासनमान्यता असली तरी या ठिकाणी बेकायदेशीरपणे गर्भपात केले जात असल्याच्या संशयावरुन आज अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी आढळून आलेल्या रुग्ण महिलेची विचारपूस केली असता ती याआधी सुरत येथून गर्भलिंग तपासणी करुन आली होती.

यानंतर सुमन हॉस्पिटल मधील डॉ. सोनल वानखेडे यांच्याकडे येवून तीने गर्भपात करुन घेण्यासाठी सल्ला घेतला. तीन दिवसांपुर्वी डॉ. सोनल वानखेडे यांनी संबंधीत महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिल्याने ती आज याठिकाणी आल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. तत्पुर्वी संबंधीत महिलेला काही औषधे देण्यात आली होती.

साधारण साडेचार हजाराची औषधेही या रुग्ण महिलेने खरेदी केल्याचे सांगण्यात आले. याचवेळी ऐका बंद खोलीतून एका महिलेचा आवाज आला. यामुळे संशय बळावल्याने आम्ही त्या खोलीकडे गेलो असता, ती खोली आतून कडीबंद असल्याचे लक्षात आले. यावेळी रक्ताळलेल्या अवस्थेत साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला. ही गोष्ट डॉक्टर म्हणून मला देखील धक्कादायक वाटली.

यामुळे आजच्या चौकशीचा पंचनामा करुन जिल्हाधिकार्‍यांकडे तो सादर करण्यात येणार आहे. यानंतर डॉक्टर वानखेडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण होऊ शकेल. अशी माहिती दिली.

गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायद्यानुसार सुमन हॉस्पिटलच्या नोंदवहीत (रजिस्टर) रुग्ण महिलांच्या तपासणीची योग्य प्रकारे नोंदणी होत नसल्याचे देखील आढळून आले आहे. यापुर्वी केलेल्या पाहणीत देखील ही त्रुटी आढळली होती.

त्या नोंदवही मधील काही पाने देखील फाटलेली आढळून आली आहेत. त्यामुळे सदरची नोंदही घेण्यात आली असून याबातही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती चौकशी पथकाच्या सदस्या जिल्हा विधी सल्लागार ऍड. मिरा माळी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *