जिल्हाधिकारी कार्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ 

विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त वातावरणात द्यावी परीक्षा-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

धुळे जिल्हा

विद्यार्थ्यांसाठी दहावी व बारावीचे वर्ष हे अत्यंत महत्वाचे वर्ष मानले जाते. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

दहावी, बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बोलत होत्या. या कार्यक्रमांस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. प्रश्न सोडविण्याचा सराव करावा. सोपे प्रश्न प्रथम सोडवावेत. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. त्याचीही माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा. आवश्यकता भासल्यास पालकांशी संवाद साधावा. पालकांनीही पाल्यांच्या क्षमतेनुसार अभ्यास करून घ्यावा. त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधावा. कॉपीमुक्त परीक्षा अभियानात राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी सांगितले की, या परीक्षकांसाठी जिल्ह्यात केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. कॉपी प्रकारास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *