महसूल सप्ताहाचा धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभांरभ ; उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव 

महसूल दिनी उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव 

महसूल सप्ताहाचा धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभांरभ ; उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव 

धुळे जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे ‘महसूल सप्ताहा’चा शुभारंभ जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते महसूल संवर्गातील कार्यरत उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करुन अत्यंत उत्साहात करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, बालाजी क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसिलदार पंकज पवार, महेंद्र माळी, प्रविण चव्हाणके, साहेबराव सोनवणे, अनिल गवांदे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रांरभी, जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महसुल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत कामकाजात महसूल विभागाचा संबंध येतो. महसूल खात्यामध्ये काम करताना सर्वांना अभिमान वाटला पाहिजे अशी कामे सर्वांनी जबाबदारीने पार पाडावी. कामे करतांना नागरिकांना चांगल्या सोईसुविधा देवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामे केलीत. अशा गुणगौरव झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी इतर अधिकारी, कर्मचा-यांनी अधिक चांगली कामे करावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तळपाडे म्हणाले की, राज्याच्या गतिमान प्रशासनात महसूल विभाग अग्रस्थानी आहे. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्ह्यात महसूल सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त दर दिवशी वेगवेगळे उपक्रम महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात सन 2024-2025 मध्ये नैसर्गिक आपत्ती, संजय गांधी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना विहीत कालावधीत अनुदान दिले आहे. अशा अधिकारी, कर्मचारी यांचा आज गुणगौरव करण्यात येत असून असेच उल्लेखनीय काम त्यांनी आगामी काळात करावेत असे त्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक म्हणाले की, महसूल विभाग हा लोकोपयोगी असा विभाग आहे. या विभागाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ॲग्रीस्टीक योजना, निवडणूकीचे कामकाजासह इतर विभागाच्या योजनांची कामे अंत्यत कमी वेळेत पूर्ण केले आहे. आगामी काळात नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येत असल्याने त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी कामे करावीत.

उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर म्हणाले की, महसूल विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, नागरिकांना या सेवांचा प्रभावीपणे, पारदर्शकरित्या लाभ देण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात ई-प्रणाली, एआयचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. देवमामलेदारांनी महसूल विभागाला जी दिशा दाखविली आहे. तेच ध्येय लक्षात घेवून आगामी काळात महसूल विभागाची प्रतिमा उंचावेल अशी कामे करावीत. तहसिलदार साहेबराव सोनवणे म्हणाले की, तहसिलदार हा तालुक्याचा महसूलचा महत्वाचा कणा आहे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने आणि इतर सर्व सबंधित विभागाने उत्तम कामे करुन संकटाशी सामना केला आहे. कर्मचारी वर्गांने अंत्यत चांगली कामे केल्यामुळेच मला हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

*यांचा झाला गुणगौरव*

तहसिलदार (साक्री), साहेबराव सोनवणे, तहसिलदार (शिरपूर) महेंद्र माळी, नायब तहसिलदार, संजय पवार, महेश साळुंखे, लघुलेखक संतोष जोशी, मंडळ अधिकारी अनिता भामरे, अनिल बाविस्कर, सदाशिव सुर्यवंशी, सहायक महसुल अधिकारी विनोद चौधरी, मन्सुर शेख, महसुल सहायक ज्ञानेश येवला, श्रद्धा पाटील, विलास मोरे, ग्राम महसूल अधिकारी सुजीत पाटील, छाया राऊत, वाहनचालक महादेव पवार, शिपाई राजेंद्र बोरसे, अजय पवार, कोतवाल नानाजी पवार, हर्षल माळी, पोलीस पाटील संजय पाटील, भिमराव मोहिते यासर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल कर्मचारी सुरेश पाईकराव, मन्सुर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, मंडळ अधिकारी अर्चना पौळ यांनी तर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *