*पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्काराने गौरव*
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीसाठी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला १८ हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत. त्याच प्रमाणे अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरले जावे यासाठी आवश्यक भुसंपादन करण्यास राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे, आवश्यक निधीची देखील तरतूद आम्ही करु. सोबतच नाशिक आणि धुळे असा रक्षा कॉरिडॉर निर्माण करण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात सुध्दा १५ हजार कोटीची गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांसोबत जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
धुळ्यात आयोजित लोकनेते स्व.रोहिदास पाटील यांच्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्यात पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकनेते स्व. रोहिदास पाटील जनसेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आज दि.२७ सप्टेंबर २०२५ रोजी धुळ्यातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कॉलेज मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन आणि जनसेवा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. मध्यप्रदेशचे नगरविकास मंत्री ना.कैलाश विजयवर्गीय हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आ.अमरिश पटेल, माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, खा.डॉ. शोभाताई बच्छाव, आ.अनुप अग्रवाल, आ.राम भदाणे, आ.काशिराम पावरा, आ.मंजुळा गावीत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापु खलाणे, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जेष्ठ नेते सुभाष देवरे, माजी जिप अध्यक्षा धरतीताई देवरे, भाजपा प्रवक्ते संजय शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गिताने करण्यात आली. त्यानंतर स्व.रोहिदासजी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी अभिवादन करीत श्रंध्दाजली अर्पण केली. लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आणि मा.आ.कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विजयवर्गीय, डॉ.प्रकाश आमटे आदींचे स्वागत आणि सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील पूर परिस्थिती विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून सविस्तर माहिती दिली आहे, त्यांनी या संकटकाळी महाराष्ट्राच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली आहे. या भेटी वेळी आम्ही महाराष्ट्रासाठी तीन रक्षा कॉरिडोर निर्माण करण्याची मागणी पंतप्रधान कडे केली आहे यातील एक कॉरिडॉर नाशिक आणि धुळे जिल्ह्यात साकारला जाईल. त्यातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. धुळे जिल्ह्याच्या तसेच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचे प्रयत्न आपले सरकार करीत आहे. अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी ताई आमटे यांनी हेमलकसा येथे आदिवासींसाठी जीवनभर केलेल्या सेवाकार्याचा गौरव देखील मुख्यमंत्र्यांनी केला. लोकनेते स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला. तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांच्याकडे स्वर्गीय रोहिदास पाटील यांचा वारसा आहे, धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे व्हिजन मोठे आहे त्यासाठी आवश्यक ती साथ आम्ही नक्की देऊ असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मध्यप्रदेशचे नगर विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी देखील लोकनेते रोहिदास पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले.
पुरस्कार्थी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी जनसेवा पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.