मुंबई
धुळे शहर आणि परिसरात पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी देवपूर, वलवाडी व इतर भागात सुयोग्य सांडपाणी गटाराची व्यवस्था करण्यात यावी. सखल भागात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच महानगरपालिका परिसरात होत असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात आज धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, धुळे महानगरपालिका तापी पाणी पुरवठा योजना सुकवद ते बाभळे, बाभळे – धुळे – मालेगाव रोड, दगडी टाकी या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने करावे. तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या अवधान येथील ७५ एकर क्षेत्र जमिनीवर १५-२५ मेगावॅट क्षमतेचा स्वमालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा. पाणीपुरवठा योजना व पथदिवे उभारणी करण्यात यावी, हा प्रकल्प समाजहिताचा असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.