उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी

नवी दिल्ली

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं आज दुपारी झालेली ढगफुटी आणि खिरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पुरामुळे धऱाली इथली संपूर्ण बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितलं.

लष्कराच्या जवानांचं पथक, SDRF, NDRF, जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून १५ ते २० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. सुमारे ४० जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवाई दलही लवकरच बचाव कार्यात सहभागी होणार आहे. धराली परिसरात हॉटेल, रेस्टॉरंट, रेस्ट हाऊस असल्यामुळे तिथं अनेक नागरिक असण्याची शक्यताही जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली.

धराली इथं झालेल्या ढगफुटी दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना दूरध्वनी करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *