धुळे जिल्हा प्रशासनाने जनगणनेसाठी सज्ज राहण्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या सूचना
धुळे जिल्हा
जनगणना 2027 ही डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूक, पारदर्शकपणे करताना राष्ट्रीय मानकांचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश सहसचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जनगणनेबाबत बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक (शिरपूर), रोहन कुवर (धुळे) आदी उपस्थित होते.
डॉ. डांगे म्हणाल्या की, जनगणना 2027 अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यामध्ये संकलित होणारी माहिती विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उपयुक्त ठरणार आहे. जनगणना 2027 ही डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूक, पारदर्शकपणे करताना राष्ट्रीय मानकांचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावे, जनगणनेत संकलित होणारी माहिती गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. 2011 नंतर ही जनगणना होत आहे. त्यामुळे जनगणना 2027 मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. नागरिकांमध्ये जनगणनेविषयी माहिती होण्यासाठी मोठया प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी. जनगणना कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करावे. टेक्निकल असिस्टंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सेन्सर सेलची नियुक्ती करावी. जनगणनेबाबत नियमित आढावा बैठकी घेण्यात याव्यात.
जनगणना २०२७ ची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या जनगणनेत नागरिकांनाही प्रगणक येण्यापूर्वी स्व-गणना सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही डॉ.डांगे यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पवार तसेच महानगरपालिका आयुक्त श्री. कापडणीस यांनी जिल्ह्यातील जनगणनेच्या तयारी विषयी माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.