धुळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे अशा सूचना धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025- 26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर अभियानाची पूर्वतयारी म्हणून धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी श्री शेख हे बोलत होते .यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.वि)श्री महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) श्रीमती स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पावस्व) श्रीमती निशा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क) श्री अजय फडोळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती जयश्री सार्वे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री नितीन खंडेराय ,श्रीमती भावना पाटील श्री पी एस महाले आदी उपस्थित होते .
याप्रसंगी बोलताना श्री अजीज शेख म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासोबतच गाव पातळीवर लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय एक अधिकारी नेमण्यात यावा. प्रत्येक गावामध्ये दिनांक 17 सप्टेंबर 2025 व 30 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे . गावात कार्यशाळा, प्रभात फेरी, कलापथक, वृक्षदिंडी यासह विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी तसेच अभियानाची प्रभावी प्रचार प्रसिद्धी जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करावा. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून धुळे जिल्हा या अभियानामध्ये अग्रक्रमावर राहील या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन श्री शेख यांनी यावेळी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंगळे यांनी सांगितले की, ग्रामसभेत अभियानाची माहिती देणारे फलक लावण्यात यावे. अभियानाच्या शुभारंभाच्या ग्रामसभेला सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य, रेशन दुकानदार, डॉक्टर ,वकील, सेवानिवृत्त अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक ,संगणक परिचालक, तलाठी, कोतवाल, आरोग्य सेवक ,रोजगार सेवक यांच्यासह गावातील सर्व घटकांना बोलवण्यात यावे. सर्वांच्या योगदानातून अभियान यशस्वी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या. याप्रसंगी अभियानाच्या यशस्वी तिच्या दृष्टीने अनुषंगिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.