मुंबई
धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल, अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, धुळे येथे उद्योग विस्तारासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच देवपूर, वलवाडी व सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. धुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन डीआय पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, भुयारी मलनिस्सारण योजनेसाठी निधी मंजूर करणे बाबत सूचना दिल्या.
तसेच, धुळे शहरास दरवर्षी पाणी वितरण व पथदिव्यांसाठी ३२ ते ३३ कोटी रुपयांचा वीज खर्च होत असून, हा भार कमी करण्यासाठी योग्य जागेवर सौर प्रकल्प उभारावेत, असेही त्यांनी सांगितले. शहराचा विस्तार ४६.४६ चौ.कि.मी. वरून १०१.०८ चौ.कि.मी. पर्यंत झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या हद्दीतील मुलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करावा, रावेर येथील जागा एमआयडीसी ला हस्तांतर करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा
अशा सूचना त्यांनी दिल्या.
याशिवाय, चाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.