नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन
धुळे जिल्हा
राज्य शासनाच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ही विशेष मोहीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 1,843 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ज्यांना डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास आहे किंवा डोळ्यांची तपासणी करायची आहे, अशा नागरिकांनी आपल्या जवळच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र येथे जाऊन तपासणीसाठी नावनोंदणी करावी. नोंदणीनंतर डोळ्यांची प्राथमिक तपासणी केली जाईल व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मोतीबिंदूवर वेळेत उपचार झाल्यास दृष्टी वाचू शकते, हे लक्षात घेऊन नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.