पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडावर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष चौकशी समिती गठीत
मुंबई
राज्यात झालेल्या बोगस शालार्थ आय.डी. द्वारे शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी अखेर ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. याबाबत शासन आदेश आज जारी करण्यात आला.
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडावर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली, पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा यांचाही समावेश या समितीत आहे.
राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी, संघटना व तक्रारदार नागरिक यांचेकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा बोगस शिक्षक भरती घोटाळाराज्यभरात गाजला. त्यानुषंगाने राज्यात नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, लातूर, मुंबई इत्यादी ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आल्याबाबतच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने विशेष चौकशी पथक (S.I.T.) नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते. अखेर ही विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली असून यात
श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे (I.A.S.)- पथक प्रमुख
श्री. मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S.)- सदस्य
श्री. हारुन आतार, सह संचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य,पुणे- सदस्य सचिव यांचा समावेश आहे.
* विशेष चौकशी पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल :-
१. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता / शालार्थ मान्यता/सेवासातत्य/विना अनुदानीत वरुन अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे,
२. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या देण्यात येणा-या विविध मान्यतांच्या संदर्भात उदा. वैयक्तिक मान्यता / शालार्थ मान्यता इत्यादिंच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्यानुषंगाने कराव्याच्या बदलाबाबत सुधारणा सुचविणे.
३. विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमुद प्रकरणी सन २०१२ ते आजतागायत प्रकरणांची चौकशी / तपास करावा.
४. विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा.
५. सदर चौकशी कालावधीमध्ये विशेष चौकशी पथकाकडुन केलेल्या मागणीनुसार मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य आयुक्त (शिक्षण), पुणे कार्यालयाद्वारे पुरविण्यात यावे.
असे शासन आदेश ७ रोजी रनजित सिंह देओल, प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन यांनी जारी केले आहेत.