धुळे जिल्हा
पिंजारझाडी, ता. साक्री, जि.धुळे येथे अंदाजे 16 वर्ष वय असलेली बालिका व अंदाजे 20 वर्ष वय असलेला बालक यांचा विवाह 23 मे, 2025 रोजी होणार असल्याबाबतची माहिती 22 मे, 2025 रोजी रात्री 11.32 वाजता चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर धुळे येथे मिळाली. माहिती मिळाताच बालविवाहाचे गांभीर्य जाणून तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन धुळे टीमचे (केसवर्कर) संदिप पवार यांच्या मदतीने पिंजारझाडी गावाचे बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका व तसेच डायल नंबर 112 क्रमांकावर तातडीची मदत म्हणून माहिती देण्यात आली. साक्री पोलिस स्टेशनशी संपर्क साधून आपल्या स्तरावरुन तात्काळ बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आले.
पिंजारझाडी गावातील कोवळया हातांना हळद लावण्याचा विचार कुटुंबीयांनी केला त्यानुसार मंडप उभारणी देखील केली होती. तयारीही जोरात होती, मात्र चाईल्ड हेल्पलाईन 1098 धुळे यांना बालविवाहाची माहिती मिळाली. विभागातील कर्मचारी श्री. संदिप पवार (केसवर्कर) यांनी तातडीने पिंजारझाडी गावातील ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांना या घटनेविषयी माहिती दिली, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार जो कोणी बालविवाह घडवून आणेल अथवा त्यास प्रोत्साहन देईल त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी दिल्यावर दोन्ही कुटुंब विवाह थांबवण्यास तयार झाले.
त्यानंतर मंडप उतरविण्यात येऊन बालविवाह थांबविण्याची कार्यवाही केली. बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. उषा साळुंखे, सदस्य प्रा. सुरेखा पाटील, सदस्य अॅड अनिता भांबेरे यांनी कुटुंबाला समुदेशन केले. बालिकेच्या पालकांकडून बालिकेचे वय 18 वर्ष पुर्ण व मुलाच्या पालकांकडुन मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण होईपर्यंत त्याचा विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहुन घेण्यात आले.
बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करतांना ग्रामसेवक श्री. भगवान पावरा, पोलिस पाटील सुरेश जगताप, सरपंच रामचंद्र साबळे, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प येथील पर्यवेक्षक एस. एम. मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जयप्रकाश जगताप, साक्री पोलिस स्टेशनचे पोकॉ/१८१९ मंगेश खैरनार, पोकॉ डी.एन.मावची, तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चे केसवर्कर श्री. संदिप पवार यांनी कामकाज पाहिले. त्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतिष चव्हाण व चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
बालविवाह होत असतांना आपल्या निर्दशनास आल्यावर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र.१०९८ वर संपर्क करावा. या नंबरवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येते. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.