पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना टीप मिळताच दारू तस्करांना दणका, एक कोटींचा माल पकडला

धुळ्यात बेकायदा मद्य वाहून नेणारे
वाहन पकडले, एक कोटींचा माल जप्त

धुळे जिल्हा

धुळे शहरातील मोहाडी नगर पोलिसांनी बेकायदेशीर मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई करत विदेशी बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल एक कोटी दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मोहाडी नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालमोटर मधून (क्र. एमएच २३ एयू ७०४२) मालेगावकडून धुळे मार्गे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे. ही माहिती त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (धुळे शहर) राजकुमार उपासे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन केले.

पोलिसांनी पकडलेली मालमोटर थेट मोहाडी नगर पोलीस ठाण्यात आणली आणि झडती घेतली असता झडतीदरम्यान मालमोटारितून गोवा व्हिस्की नावाच्या विदेशी दारूचे एक हजार ५०० खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात ४८ बाटल्या असून त्यांची प्रत्येकी किंमत १२८ रुपये आहे. यामुळे पोलिसांना या कारवाईत जवळपास ९२ लाख १६ हजार रुपयांची केवळ दारू सापडली आहे. यासोबतच पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीची मालमोटर असा एकूण एक कोटी दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *