धुळ्यामध्ये धर्म परिवर्तनाचा प्रयत्न मुंबईच्या ३ महिलांवर गुन्हा दाखल

आ.अनुप अग्रवाल यांनी घेतली गंभीर दखल रासकर नगरात पाहणी करीत पोलिसांना दिले कारवाईचे निर्देश

धुळे शहर

धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचे वाटप करण्यासह त्यांचे वाचन केल्यास तुमचे असाध्य रोग दूर होतील, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येतील, असे सांगत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना माहिती दिली असता संबंधित युवतींसह महिलेला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा शहर पोलिसांत याप्रकरणी रोहित चांदोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कांदिवली, मुंबई येथील दोन महिला आणि एक तरुणी अशा तीन जणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना आज सकाळी काही युवती व महिला विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचे वाटप करत होत्या. एवढ्यावरच न थांबता या युवतींनी या पुस्तकांचे वाचन करण्यासह तुम्ही धर्म परिवर्तन केल्यास तुमचे सर्व असाध्य रोग दूर होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येतील, तसेच तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल, असा सल्लाही देत होत्या. रुग्णालयात गेलेल्या एका कार्यकर्त्याने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर युवतींसह महिलांना हटकले असता त्या तेथून तातडीने निघून गेल्या. यानंतर या कार्यकर्त्याने संबंधित युवतींच्या मागे त्या कुठे जातात हे पाहण्यासाठी दोन जणांना पाठविले. तसेच याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांना दूरध्वनी करत माहिती दिली.  दरम्यानच्या काळात या युवती व महिला शहरातील रासकरनगरमधील एका घरात गेल्या. त्याची माहिती आमदार अग्रवाल यांना देण्यात आली.

रासकर नगरात हजारो पुस्तके हस्तगत

आ.अनुप अग्रवाल पदाधिकार्‍यांसह रासकरनगरमधील संबंधित घरी पोहोचले. त्यांनी घरात पाहणी केली असता तेथे विशिष्ट धर्माची धर्म परिवर्तन घडवून आणण्यासाठीची दीड ते दोन  हजार पुस्तके आढळून आली. याबाबत आमदार अग्रवाल यांनी संबंधित घरातील महिलेसह युवतींशी चर्चा करत माहिती घेतली. त्यात मुंबई येथील या युवती व महिला तीन ते चार दिवसांपासून या घरात राहत असल्याचे समजले. यानंतर आमदार अग्रवाल यांनी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिस रासकरनगरमध्ये दाखल झाले व त्यांनी घराची पाहणी करत तेथे विशिष्ट धर्माची धर्म परिवर्तनासाठी वापरली जाणारी पुस्तके आढळून आली. शहर पोलिसांनी ही सर्व पुस्तके ताब्यात घेत संबंधित युवती व महिलेला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रोहित चांदोडे यांनी दिली फिर्याद

दरम्यान, याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात रोहित चांदोडे रा.नाटेश्वर कॉलनी, नटराज टॉकीज परिसर, धुळे यांनी फिर्याद नोंदवली. त्यात म्हटले आहे की, धुळे शहरातील हिरे मेडीकल कॉलेज रुग्णालयात येथे व दुपारी ३ वाजेला मिलपरीसर रासकर नगर येथे रेखा धनराज सैदाणे (वय ४०) व शालुम धनराज सैंदाणे (वय १८) दोघे रा. रुम नं. ३०, महात्मा गांधी चाळ, कांदीवली पु. मुंबई  आणि सुषमा अंकुर वर्मा (वय २९) रा.एकवीरा सोसायटी, चारकोप कांदीवली प. मुंबई. या तीन जणींनी छापील पत्रके व पुस्तके वाटून त्यातून रुग्णांचा आजार बरा होईल व त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नाही असे आमिष दाखवून लोकांची दिशा भूल करुन ख्रिश्‍चन धर्माचे प्रचार व प्रसार करुन तुमच्या हिंदू धर्माच्या मुर्ती पुजा पेक्षा आमच्या धर्माचे काम श्रेष्ठ आहे. असे म्हणून धार्मिक तेढ निर्माण करुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न करुन हिंदू धर्मियांचा एकोपा राहु नये असे कृत्य करतांना मिळून आले. यावरुन तिघा संशयीत महिलांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *