धुळे जिल्हा
स्पंदना फायनान्स लि. कंपनीच्या शिंदखेडा शाखेच्या व्यवस्थापकानेच त्याच्या मित्राच्या मदतीने कंपनीचे दरवाजाचे कुलूप उघडुन लॉकर तोडुन चार लाख ६८ हजार ५५७ रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार पोलीसांनी उघडकीस आणला. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोरीतील मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार १३ मे रोजी स्पंदना फायनान्स कंपनीच्या शिंदखेडा येथील शाखेतून अज्ञात चोरटयाने कंपनीच्या दरवाजाचे कुलूप उघडुन आत प्रवेश केला आणि लॉकर तोडुन चार लाख ६८ हजार ५५७ रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
या गुन्हयाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आपला तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी गुप्त पद्धतीने माहिती मिळविली आणि स्पंदना फायनान्स लि. कंपनीच्या शिंदखेडा येथील शाखेचे व्यवस्थापक सुभाष परमा चव्हाण (वय-२८ वर्ष), रा. खेडी (ता.अमळनेर जि. जळगांव हल्ली मुक्काम लक्ष्मीनारायण कॉलनी, विरदेलरोड, शिंदखेडा याच्यावर संशय व्यक्त करून त्याची चौकशी केली. या चौकशीतच चोरीचे धागेदोरे निरीक्षक पवार यांना मिळाले आणि त्यांनी आपला मोर्चा मुख्य संशयित चव्हाण याचा मित्र पवन दगड्डु पाटील (वय-३५ वर्ष), रा. खेडी (ता.अमळनेर जि. जळगांव) याच्याकडे वळवीला. चव्हाण याने पवन पाटील याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि चोरी केलेल्या रकमेपैकी चार लाख ६८ हजार ५५७ रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांना काढुन दिला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, संजय पाटील, शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, चेतन बोरसे, सुशिल शेंडे, हर्षल चौधरी, सुनिल पाटील, विनायक खैरनार व कैलास महाजन यांनी केली.