पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपतर्फे बुधवारपासून विविध उपक्रम

प्रदेश प्रवक्ते डॉ. लक्ष्मण सावजींच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा

धुळे जिल्हा

भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यभरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा येत्या ३१ मेस त्रिशताब्दी जयंती महोत्सव होत आहे. या जयंती महोत्सवांतर्गत २१ ते ३१ मेदरम्यान धुळे शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रम साजरे होतील. या उपक्रमांद्वारे राजमाता अहिल्यादेवींनी समाजासाठी दिलेल्या भरीव योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. या उपक्रमांमध्ये सर्वसामान्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. लक्ष्मण सावजी यांनी आज येथे केले.
येथील आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली, तीत डॉ. सावजी मार्गदर्शन करत होते. आमदार अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. सुशील महाजन, हिरामण गवळी, जयश्री अहिरराव, अल्पा अग्रवाल, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, किरणताई कुलेवार, प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर, जितेंद्र शहा, प्रदीप कर्पे, ओमप्रकाश खंडेलवाल, चेतन मंडोरे आदी व्यासपीठावर होते. कार्यशाळेत पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉ. सावजी म्हणाले, की राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा समाजाला परिचय करून देणे, अहिल्यादेवींच्या सुशासनाची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अहिल्यादेवींनी केलेल्या कार्याची समाजाला ओळख करून देणे, त्यांच्या मूल्याधारित प्रशासनाची, शौर्याची, दूरदृष्टीने धोरणे आखून सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या सर्वसमावेश राज्य कारभाराची व अखंड भारतातील काशी विश्वनाथ, सोरटी सोमनाथ आदी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार करत त्यांनी केलेल्या आध्यात्मिक, सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. येत्या ३१ मेस राजमाता यांची ३०० वी जयंती आहे. या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपतर्फे राज्यभरात २१ मे ते ३१ मेदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
डॉ. सावजी म्हणाले, की राजमाता अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवांतर्गत विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करणारे कार्यक्रम होतील. बुकलेट, पत्रकांद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनासह त्यांच्या राज्य कारभाराचा परिचय करून दिला जाईल. यामध्ये जनसंपर्क कार्यक्रम, सांस्कृतिक तसेच विशिष्ट समाजघटकांसाठी विविध कार्यक्रम होतील. आपल्या परिसरातील मंदिरांसह घाटांवर स्वच्छता अभियान राबविले जाईल. अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य चित्ररथ, मिरवणुका निघतील. नृत्य, नाटक, लोककलांद्वारे अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर होतील. शैक्षणिक संस्थांमध्ये परिसंवाद, चर्चात्मक कार्यक्रम होतील. विद्यार्थ्यांसाठी क्वीझ, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा होतील. तसेच ठिकठिकाणी प्रदर्शने होतील. पत्रकार व बुद्धिजीवींसमवेत चर्चासत्र, महिला मेळावे, युवा मेळावे, महिलांसाठी मॅरेथॉन, पथनाट्य, अहिल्यादेवींच्या कार्याची महती सांगण्यासाठी वक्त्यांची व्याख्याने आदी उपक्रम होतील. यामध्ये पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. सावजी यांनी केले.
भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी शहरात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन केले. श्री. अंपळकर यांनी धुळे शहरात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून २१ ते ३१ मेदरम्यान विविध उपक्रम राबविले जातील, याची ग्वाही दिली. ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले. पृथ्वीराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


जयंतीसह प्रदर्शनी, रक्तदान शिबिर : आमदार अग्रवाल

अंबोडे येथील गणपती मंदिर, आर्वी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दगडी पूल, धुळे शहरात स्मारकाचा जीर्णोद्धार करत आहोत. त्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम प्रगतिपथावर असून, पुढील जयंतीपर्यंत हे काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही आमदार अग्रवाल यांनी दिली. राजमाता अहिल्यादेवींच्या प्रेरणेने केंद्र व राज्य सरकार विविध समाजहिताची कामे करत आहेत. त्यांच्या प्रेरणेने व शहरवासीयांच्या आशीर्वादाने आम्हीही शहरात विकासकामे करत आहोत. येत्या ३१ मेस राजमाता अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालयात भव्य कार्यक्रम होईल. टॉवर बगीच्यातील अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ प्रदर्शनी भरविली जाईल. धुळेकरांच्या सहभागाने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम होतील. यामध्ये सर्वांचा सहभाग असेल याची काळजी घेऊ, अशी ग्वाहीही आमदार अग्रवाल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *