धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील मोराणे ब्रिजच्या खाली पकडण्यात आलेल्या एका कारमधून सुमारे ६ लाखांचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत करीत धुळे तालुका पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. कार आणि गांजा असा २१ लाख १६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यातून नाशिक येथे बेकायदेशीरपणे हा गांजा नेला जात होता. ही कारवाई आज शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
एमपी ०९ डीएन ११४७ क्रमांकाची कार शिरपूर येथून निघाली असून ती धुळे मार्गे नाशिकला जाणार आहे. त्यात गांजा सदृश्य पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील मोराणे गावानजिक असलेल्या ब्रीजखाली पोलिसांनी सापळा लावला. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयित कार येताच ती अडविण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यात २८ किलो गांजा आढळून आला. त्याची किंमत ६ लाख १६ हजार ४४० रुपये इतकी आहे. यासह १५ लाखांची कार असा एकूण २१ लाख १६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कारचालक अंतरसिंग वेचान बरडे (वय २६, रा.ठाकूर फल्या, केरमला, पो. बलवाडी ता. वरला, जि.बडवानी, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, कर्मचारी कुणाल शिंगाणे, धिरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, महेंद्रसिंग गिरासे, योगेश पाटील, मंगलदास कोकणी यांनी ही कारवाई केली.