धुळे जिल्ह्यात नियमित लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश

धुळे जिल्ह्यात नियमित लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न

धुळे जिल्हा

माता व बालकांमधील आजारांचे प्रमाण तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात नियमित लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले.

नियमित लसीकरण व स्टॉप डायरिया मोहिम जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. तरनुम पटेल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मोरे, डॉ. बी. आय. चव्हाण, डॉ. तुषार अहिरराव, डॉ. राहुल पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत बालकांमधील मृत्यू व आजारापणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. लसीकरणापासून पुर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालके व गरोदर माता यांचा शोध घ्यावा. 0 ते 2 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण करावे. 2 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच डीपीटी व ओरल लसीचा बुस्टर डोस राहीला असेल त्यांचे लसीकरण करावे. गर्भवती मातांचेही नियमित लसीकरण करावे. या मोहिमेत एकही माता, बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यक तेथे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. आरोग्य विभागाने ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात मोहीम राबवावी. प्रत्येक पात्र बालकाला गोवरसह अन्य लसीकरणाचे डोस द्यावेत. त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी. तसेच पुढील लसीकरणाचा डोस नियमितपणे घेतला जाईल याचीही दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात 1 जून ते 31 जुलै, 2025 दरम्यान स्टॉप डायरिमा मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी दिल्या.

यावेळी डॉ. सचिन बोडके यांनी गोवर तसेच नियमित लसीकरणाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *