धुळे शहर पोलिसांनी सुरत बायपास रोडवर केली कारवाई
धुळे जिल्हा
धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवला येथील एका संशयीत तरूणाला धुळे शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई चक्करबर्डी परिसरात करण्यात आली.
सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कुंदन पटाईत, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश मोरे, राकेश मोरे, धम्मपाल वाघ, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकुर, अमित रणमाळे आणि अमोल पगारे यांचे पथक तयार केले. या पथकाने चक्करबर्डी परिसरात पाळत ठेवली.
आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयीतास पथकाने शिताफिने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव गणेश सुरेशसिंग परदेशी (रा. बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जि.नाशिक) असे सांगितले. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोहेकॉ रविकिरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनिल पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच तो गांजा तारगल्ली, येवला (जि. नाशिक) येथील विष्णु बडोदे उर्फ पंडोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील करीत आहेत.