शिरपूर तालुक्यात रोखला बालविवाह !

*बालविवाह थांबविण्यास जिल्हा प्रशासनास यश*

बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यावर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र. 1098 वर संपर्क करावा

धुळे जिल्हा

जिल्ह्यातील भाटपुरा, ता. शिरपूर येथे एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झाली होती. त्यानुसार त्वरीत कारवाई करुन अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनास यश आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर धुळे येथे 5 मे, 2025 रोजी भाटपुरा, ता. शिरपुर जि. धुळे येथे 16 वर्ष वय असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली. याबाबत बालविवाहाचे गांभीर्य जाणून तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन, धुळे येथील सुपरवायझर महेंद्र चव्हाण, केसवर्कर संदिप पवार यांच्या मदतीने भाटपुरा गावातील बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, पोलिस पाटिल, सरपंच, अंगणवाडी सेविका यांना या प्रकरणाची त्वरीत माहिती देण्यात आली. तसेच डायल नंबर 112 क्रमांकावर थाळनेर पोलिस स्टेशनशी संपर्क साधुन तात्काळ येथे होणारा बालविवाह थांबविण्यात आला.

भाटपुरा गावातील ग्रामसेवक आणि स्थानिक यंत्रणांनी बालविवाह रोखण्याच्या प्रयत्न केला असता त्यांना विरोध करण्यात आला. परंतू, पोलिस विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करुन बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बाल विवाह घडवून आणेल अथवा त्यास प्रोत्साहन देईल, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी दिल्यावर दोन्ही कुटुंब विवाह थांबविण्यास तयार झाले. त्यानंतर कुटूंबियांना बाल कल्याण समिती, धुळे यांचे समक्ष उपस्थित करुन बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, सदस्य प्रा. सुरेखा पाटील, सदस्य अॅड. अनिता भांबरे यांनी समुपदेशन केले. तसेच पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही, तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’असे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला.

यावेळी ग्रामसेवक एम.एस.पेंढारकर, पोलीस पाटील एकनाथ राठोड, सरपंच श्रावण चव्हाण, अंगणवाडी सेविका, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे सुपरवायझर महेंद्र चव्हाण, केसवर्कर संदिप पवार यांनी कामकाज पाहिले. यासाठी त्यांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्ह्यात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यावर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र. 1098 वर संपर्क करावा. संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नांव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *