धुळे जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

धुळे जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

 पालकमंत्र्याच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

धुळे जिल्हा

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार व युवक, युवती व संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य स्थापनादिनी 1 मे 2025 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संबंधिताना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा जिल्हयातील खेळाडु, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता जिल्हा क्रीडा प्रस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक 10 हजार रुपये असे आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोदंणीकृत संस्था यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, युवक व युती करिता रोख 10 हजार व संस्थेकरिता रोख 50 हजार असे आहे. दोन्ही पुरस्काराकरिता कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावांची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती तसेच जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीने प्रस्तावांची छाननी करुन ही निवड केली आहे.

*जिल्हा क्रीडा पुरस्कार*

सन 2023-2024 साठी जिल्हा गुणवंत खेळाडु (महिला) पुरस्कार पुर्वा दिलीप निकम यांना वुशू खेळात जाहीर करण्यात आला आहे. तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे यांना कबड्डी खेळासाठी जाहीर करण्यात आला आहे.
सन 2024-2025 साठी जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे यांना मैदानी खेळात जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार कु.अनुराधा दिलीप चौधरी वुशू या खेळात तर जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाणे यांना रायफल शुटींग खेळात तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुकदेव गोरख भिल यांना मैदानी खेळासाठी जाहीर झाला आहे.

*जिल्हा युवा पुरस्कार*

सन 2022-2023 वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) ॲड. शितल जावरे, सन 2023-2024 वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) सागर राजेंद्र पटेल, जिल्हा युवा पुरस्कार ( युवती ) कु.सुवर्णा भालचंद्र देसले, सन 2024-2025 वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रकाश शरद पाटील, जिल्हा युवा पुरस्कार ( युवती ) कु.वृदावना भीमराव पाटील तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) इंदीरा महिला मंडळ वलवाडी ता.जि.धुळे अध्यक्षा प्रभा परदेशी यांना जाहीर झाला आहे.

या दोन्ही पुरस्काराचे वितरण गुरुवार, 1 मे 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस कवायत मैदान, धुळे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह रोख पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती व जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *