पंचायत समितीस्तरावरील कोणत्याही कामासाठी
लाभार्थ्यांनी आर्थिक व्यवहार करू नये
गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांचे आवाहन
धुळे जिल्हा
पंचायत समिती, धुळे मार्फत मोठ्या प्रमाणात घरकुल व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक कामे मंजूर करण्यात आली आहे. तसेच काही मंजूरीची कामे प्रस्तावित आहेत. धुळे तालुक्यातील सर्व 131 ग्रामपंचायत मधील लाभार्थ्यांनी रोजगारसेवक व संगणक चालक यांच्याशी आर्थिक व्यवहार करू नये. संबंधितानी आर्थिक मागणी केल्यास पंचायत समिती, धुळे येथे लेखी व तोंडी तक्रार करावी. असे आवाहन गटविकास अधिकारी तथा प्रशासक गणेश चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गटविकास अधिकारी श्री. चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, घरकुल व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सर्व मंजूर लाभार्थीना पंचायत समितीस्तरावरून ग्रामस्तरावर दोन्ही योजनांचे कामकाज करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, ग्राम पंचायत ऑपरेटर यांची नेमणूक केलेली आहे.
तसेच पंचायत समितीस्तरावर मग्रारोहयो कक्षात कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस असलेले सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर यांचे कामांचे फोटो अपलोड करणे, मस्टर काढणे इत्यादी कामे करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात नियुक्ती केलेली आहे, तांत्रिक सहाय्यकामार्फत कामाचा फोटो काढून पंचायत समितीकडे पाठविणे, नवीन कामांना रेखांकन (लाइन ऑउट) देणे, झालेल्या कामांचे मोजमाप पुस्तिकेत नोंदविणे इ. कामे केली जातात. यावेळी संबंधित लाभार्थीकडून आर्थिक लाभाची अपेक्षा/मागणी केले जात असल्याबाबत तक्रारी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व लाभार्थी यांचेकडून पंचायत समिती कार्यालयाकडे मोघम स्वरूपात करण्यात येतात.
त्यामुळे सर्व मंजूर लाभार्थीनी कोणत्याही कामासाठी वरील कोणाशीही आर्थिक देवाण-घेवाण करू नये तसेच कोणालाही आर्थिक मागणी करून आपले काम अडविण्यात आले आहे असे वाटत असल्यास या कार्यालयाकडे संबंधिताच्या विरोधात लेखी स्वरूपात तक्रार करावी. संबंधित लाभार्थीचे प्रलंबित काम मार्गी लावण्यात येईल, त्यानंतर संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याच्या विरुध्द आवश्यक ती कठोर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असेही धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी कळविले आहे.