मुंबईतील जैन मंदिर पाडण्याच्या निषेधात
धुळे शहरासह साक्रीत जैन समाजाचा मोर्चा
धुळे जिल्हा
विलेपार्ले मुंबई येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची वास्तु पाडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत आज धुळ्यात सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले. साक्रीतही मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
धुळे शहरातील जैन स्थानकापासून हा मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. या मोर्चात पुरुषांसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता केवळ फलकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रमुख रस्त्यावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर निवडक मंडळींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत निवेदन दिले.
धुळे तालुक्यातील आर्वी गावातील जैन समाजबांधवांनीही धुळ्यातील निषेध मूक मोर्चात सहभाग नोंदवला. जैन व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली. तसेच साक्री शहरातही सकल जैन समाजाच्या वतीने भव्य निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जैन समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयावरधडकल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याचा निषेध करतानाच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकीस्तानला धडा शिकविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजबांधवांनी आपली दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.