लुटमारीच्या पैशातून मौजमजा धुळे एलसीबीने ठोकल्या बेड्या

फायनान्स कंपनी कर्मचार्‍याला लुटणार्‍या टोळीचा लावला छडा, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

धुळे शहर

फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याला लुटून मिळालेल्या पैशातून सव्वा लाखाची मोटर बाईक आणि नवा आयफोन विकत घेणार्‍या बादल रामकोर याच्यासह आनंदा सोनवणे या दोघांना अटक करीत धुळे एलसीबीने लुटमारीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याला १ लाख ६५ हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल टॅब जबरीने चोरुन नेण्याची घटना शहराजवळील अन्वर नाला परिसरात घडली होती. या चोरीचा यशस्वीपणे तपास करीत धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पथकाने लुटमार करणार्‍या ५ जणांच्या टोळीचा शोध लावत दोघांना अटक केली आहे. संशयीतांकडून २ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ४ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास भारत फायनान्स कंपनीचा कर्मचारी आकाश छोटू कोळी हा बचत गटाचे पैसे गोळा करुन ते भारत फायनान्स प्रा.लि. मारोती नगर चाळीसगांव रोड येथे जमा करण्यासाठी जात असतांना त्याला अन्वर नाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सी जवळ रोडावर मोटरसायकल थांबवून अज्ञात टोळक्याने १ लाख ६५ हजार रुपये रोख आणि दोन टॅब बळजबरीने हिसकावून नेले हेाते. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरु असतांना पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे दि. २२ एपिल रोजी वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंड परिसरातून बादल रमेश रामकोर (वय २४) रा.वरखेडी चौफुली, धुळे व आनंदा श्रावण सोनवणे (वय २०) रा.एकता नगर, पंकज हॉटेलच्या पाठीमागे, अन्वर नाला जवळ भिलाटी, धुळे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यांनी सदरचा गुन्हा इतर तीन साथीदारांसह केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. या टोळीतील रामदास उर्फ आप्पा छोटू पवार, अर्जुन बुधा मोरे रा. मुंबई आग्रा महामार्ग मोराणे तसेच प्रविण नारायण शिंदे रा.वरखेडी रोड हे तिघे उद्याप फरार आहेत.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १ लाख ३५ हजाराची मोटरसायकल जी बादल रामकोर याने चोरी केलेल्या पैशातून विकत घेतली होती ती जप्त केली आहे. तसेच गुन्हा करण्यासाठभ वापरलेली ५० हजाराची दुसरी मोटरसायकल आणि ५ हजाचारा टॅब, ४६ हजार ४०० रुपयांचा आय फोन असा एकुण २ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल संशयीतांकडून हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, पोलिस हे कॉ शशिकांत देवरे, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, मेहेंद्र सपकाळ, मुकेश वाघ, दिनेश परदेशी, संतोष हिरे, हर्षल चौधरी, विनायक खैरनार, अमोल जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *