नंदी रोडवर मध्यरात्री घडलेल्या घटनेने धुळे शहरात खळबळ
धुळे शहर
मोटरसायकल चा गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून एका १८ वर्षीय तरुणाला दोन जणांनी मारहाण करीत सिमेंड कॉंक्रीटच्या रोडावर त्याचे डोके आपटून आपटून ठार मारल्याची धक्कादायक घटना काल रात्री धुळ्यात नंदी रोडवर घडली. फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी असे मयत तरुणाचे नाव असून तो धुळ्यातील मच्छिबाजार, निशात चौक येथील रहिवाशी होता. या प्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी आज पहाटे चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात मोहमद साजीद अब्दुस लतीफ अन्सारी रा. मच्छिबाजार, ग.नं. ७, निशात चौक, धुळे यांनी फिर्याद नोंदवली. यात म्हटले आहे की, काल १६ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे शहरातील नंदी रोडवरील एनर जिम जवळ फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी हा तरुण जात असतांना गाडीचा डँश अर्थात धक्का लागल्याच्या कारणातून त्याचा दोन अनोळखी इसमांसोबत वाद झाला. या वादातून त्या दोन अनोळखी इसमांनी फैज अहमद याला हाताबुक्यांनी मारहाण सुरु केली. छातीवर, पोटावर लाथाबुक्यांनी मारले तसेच संगनमताने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हातांनी पकडून सिमेंट कॉंक्रीटच्या पक्क्या रोडावर फैजचे डोके ५ ते ६ वेळेस जोरात आदळून डोक्याला गंभीर दुखापत केली आणि जिवे ठार मारले.
या घटनेनंतर ते अनोळखी मारेकरी पसार झाले असू या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, पोलिस सब इनस्पेक्टर हरिशचंद्र पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी करीत पुढील कारवाई केली. तसेच या खून प्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३, ११५(२), ३५२, ३(५)प्रमाणे दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई हरिशचंद्र पाटील हे करीत आहेत. दरम्यान काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.