जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली माहिती
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शिधापत्रिकेवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या पडताळणीत अंत्योदय, प्राधान्य कुंटुंब लाभार्थी व केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांची लाभार्थ्यांची पात्रता, वय, सदस्यसंख्या इत्यादी बाबीसाठी पडताळणी करण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीत शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
पडताळणीसाठी सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानदारांकडून शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म उपलब्ध करून घ्यावा. त्यातील संपूर्ण माहिती भरून हमीपत्रासह रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावे. फॉर्म भरून देतांना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांना ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबददलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, इत्यादीपैकी कोणताही एक पुरावा जोडावा. जो एक वर्षापेक्षा जास्त कालाधीपेक्षा जुना नसावा. शिधावाटप दुकानदार यांनी संबंधीत शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना / प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्यांनी निकषानुसार खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे.
*प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांनी हे पुरावे जोडावेत :*
✅ रहिवासाचा पुरावाः- घरभाडेपावती, सातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्रक, गॅस जोडणी पासबुक, वीजेचे देयक, ड्राईव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड.
✅ ग्रामिण भागातील रहिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.44 हजारपर्यंत असल्याचे व शहरी भागातील रहिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 59 हजार पर्यंत असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडावे.
*अंत्योदय लाभार्थ्यांनी हे पुरावे जोडावेतः*
✅ रहिवासाचा पुरावा
✅ अंत्योदय योजनेत समाविष्ट होण्याकरिता पात्र असल्याबाबतचा पुरावा
✅ अंत्योदय/दारिद्रय रेषेखालीलयादीत नाव समाविष्ट असल्याबाबतचा महानगरपालिका / गटविकास अधिकारी यांचा दाखला.
✅ याव्यतिरीक्त कुटुंबप्रमुख विधवा अथवा आजारी वा अपंग किंवा 60 वर्ष वयावरील वृद्ध आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही याचा पुरावा म्हणून स्वयंघोषणापत्र व रास्तभाव दुकानरदाराचा दाखला.
✅ भूमिहिन शेतमजुर, अल्पभुधारक शेतकरी असल्याबाबत तलाठी यांचा दाखला.
✅ रोजंदारीवर काम करून उपजिविका करणारे नागरीक जसे हमाल, मालवाहक, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे यांनी संबंधीत व्यवसायाचा दाखला.
✅ कचरा वेचणा-या कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र.
*एनपीएच केशरी शिधापत्रिकाकांनी हे पुरावे जोडावेतः :*
✅ प्राधान्य कुटूंब लाभार्थीमध्ये समाविष्ट नसलेले केशरी कार्डधारक, पांढ-या शिधापत्रिकाधारकांनी रहिवासाचा पत्ता सोबत जोडावा. असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.शेलार यांनी कळविले आहे.