धुळे शहर
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात धुळे महानगरपालिकेने सन २०२५ मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सन २०२४ मध्येही मनपाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
जनजागृती, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीवर कार्यक्रम राबविण्यात आला. शासनाने निश्चित केलेल्या ११ निर्देशांकांनुसार शहरी भागात काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. लक्षणांवरून संशयित रुग्णांचा शोध, थुंकी नमुने संकलन, छातीचे क्ष-किरण तपासणी आणि प्रयोगशाळेतील विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. रुग्णांना विनामूल्य औषधोपचार देण्यात आले. उपचारादरम्यान नियमित फॉलोअप, समुपदेशन आणि निक्षय पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यात आला.
सहवासितांची तपासणी, उपचारातील दुष्परिणामांवर लक्ष आणि प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत पोषण आहार उपलब्ध करून देण्यात भर देण्यात आला. दस्तऐवजांची ऑनलाइन नोंद पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत वैद्यकीय अधिकारी, पीपीएम समन्वयक, डॉट्स प्लस पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टीबीएचव्ही, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, एएनएम, पीएचएन आणि आशा कर्मचारी यांचे योगदान राहिले. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त हेमंत निकम आणि आरोग्य अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी यांनी डॉ. जे. सी. पाटील आणि शहर क्षयरोग विभागाचे अभिनंदन केले.