धुळे महापालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी
उपमहापौर ज्योत्सना पाटील यांनी स्विकारला पदभार
धुळे शहर
धुळे महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्सना पाटील यांनी आज दुपारी समारंभाव्दारे पदभार स्विकारीत पदग्रहण केले. याप्रसंगी भाजपाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनी यांनी महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दिल्ली ते गल्ली आमची भाजपची सत्ता आहे, त्यामुळे धुळे शहराचा सर्वागिण विकास आम्ही करु, विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही. धुळेकरांना दिलेली सर्व आश्वासने येत्या पाच वर्षात पुर्ण केली जातील असे ना.गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

धुळे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धुळे शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहत तब्बल ५० नगरसेवक निवडून दिले. या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्यांनी धुळ्याच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची, तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांची निवड करत महापालिकेत महिला राज स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आज शुक्रवारी दुपारी येथील महापालिकेत धुळे शहराच्या दहाव्या महापौर म्हणून मायादेवी परदेशी यांनी शानदार समारंभारत पदभार स्वीकारला. यानंतर उपमहापौर म्हणून ज्योत्स्ना पाटील यांनी देखील पदभार स्वीकारत महापालिकेच्या कारभाराची सुत्रे नुतन लोकनियुक्त पदाधिकार्यांनी हाती घेतली आहे. महापालिकेवरील अडीच वर्षापासून सुरु असलेला प्रशासक राज देखील आज संपला.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, धुळे शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिप अध्यक्षा धरतीताई देवरे, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सौ.अल्पाजी अग्रवाल, महादेव परदेशी उपस्थित होते.
यावेळी नुतन महापौर मायादेवी परदेशी यांचा सर्व नगरसेवकांच्या वतीने भव्य पुष्पहार घालून सर्व मान्यवरांसह सत्कार करण्यात आला. जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांमध्ये महापौर मायादेवी परदेशी यांना महापौरांच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नवनिर्वाचीत महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्सना पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी बोलतांना धुळेकर जनतेने भाजपाला दिलेल्या भरघोस मतदानाबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, धुळे शहरातील जनतेने आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून ५० नगरसेवक निवडून देत सत्ता सोपवली आहे. त्यामुळे आता पुढील पाच वर्ष जनतेला दिलेली सर्व आश्वासने पुर्ण करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक तसेच महापौर आणि पदाधिकारी काम करतील. येथे आमचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह सर्व जणांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत आमची सत्ता आहे, त्यामुळे धुळे शहराच्या विकासासाठी कुठेही निधी कमू पडू दिला जाणार नाही. धुळे शहरात आजही काही भागात नियमित पाणी येत नाही तो प्रश्न सोडवला जाईल. तसेच धरणाची क्षमता वाढवण्याची मागणी आहे ती सुध्दा आम्ही पुर्ण करु. शहरातील स्वच्छता, पथदिवे, सुशोभिकरण तसेच रस्ते विकास ही कामे पुर्ण केली जातील. असेही आश्वासन देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.