महापौर, उपमहापौर यांचा पद्ग्रहणाचा मुहूर्त ठरला ! भाजपचे दिग्गज नेते राहणार उपस्थित !!

दहाव्या महापौर म्हणून मायादेवी परदेशी यांच्यासह
उपमहापौर ज्योत्स्ना पाटील शुक्रवारी स्वीकारणार पदभार
मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, आ. सर्वश्री पटेल, अग्रवाल, भदाणे आदींची उपस्थिती

धुळे शहर

येथील महापालिकेच्या दहाव्या महापौर तर पाचव्या महिला महापौर म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका मायादेवी महादेव परदेशी, तर उपमहापौर म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराला आपल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली.

दरम्यान, भाजपच्या लोकप्रतिनिधींसह सर्व पदाधिकारी पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते उत्तमराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ला पांझरा नदीकाठी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहतील.

यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, धुळे शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह महानगर, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित असतील.
येथील महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शहरातील सुजाण व विकासाभिमुख जनतेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहत तब्बल ५० नगरसेवक निवडून दिले. यातून धुळेकर जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी धुळ्याच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची, तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांची निवड करत महापालिकेत महिला राज स्थापित करण्याचा निर्णय घेतला. या निवडीनंतर आता शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराला येथील महापालिकेत धुळे शहराच्या दहाव्या, तर पाचव्या महिला महापौर म्हणून मायादेवी परदेशी या पदभार स्वीकारतील. यानंतर उपमहापौर म्हणून ज्योत्स्ना पाटील या पदभार स्वीकारतील.

उत्तमराव पाटील यांना गुरुवारी आदरांजली
दरम्यान, गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ला जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री रावल, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार अनुपभय्या अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते उत्तमराव पाटील यांना जयंतीनिमित्त पांझरा नदीकाठच्या त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहतील. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. अंपळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *