धुळे महापालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्सना पाटील यांची बहुमताने निवड 

धुळे शहर

धुळे महापालिकेच्या महापौर पदावर भारतीय जनता पक्षाच्या सौ.मायादेवी महादेव परदेशी यांची तर उपमहापौर पदावर सौ.ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली.

सत्ताधारी भाजपाच्या उमेदवार सौ.मायादेवी महादेव परदेशी ह्या ५० मते मिळवून विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार गिता नवले यांना १३ आणि एमआयएमच्या उमेदवाराला अपेक्षेप्रमाणे १० मते मिळाली. उपमहापौर पदासाठी देखील याच पद्धतीने मतदान झाल्याने भाजपच्या सौ.ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील ह्या विजयी घोषीत करण्यात आल्या.

धुळे महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज दुपारी १२ वाजेला निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
शहर विकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या गीता नवले, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे इरफान फजलू अन्सारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
तसेच एम. आय. एम. तर्फे महापौरपदासाठी हसीनाबानो साजीद अन्सारी आणि उपमहापौरपदासाठी अमीर अस्लम पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एम. आय्. एम. चे संख्याबळ दहा आहे. एक अपक्ष आणि १३ शहर विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. भाजपाचे ५० नगरसेवक असल्याने भाजपच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची बहुमताने निवड करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या समर्थकांनी एकत्र जल्लोष सुरु केला.

यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर यांनी नव निर्वाचित महापौर सौ.मायादेवी परदेशी आणि उपमहापौर सौ.ज्योत्सना पाटील यांचे अभिनंदन करीत सत्कार केला.

दरम्यान, आजच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भाजपच्या वतीने धुळे महापालिकेला भाजपच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे सजवले होते. भगव्या आणि हिरव्या रंगाच्या फुगे आणि झेंडे तसेच आकर्षक गालीचे टाकून संपूर्ण महापालिकाच भगवीमय करण्यात आली होती. निवडीपुर्वी सर्व भाजप नगरसेवकांसह पालकमंत्री रावल आणि आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ढोल ताशाच्या गजरात पायी महापालिकेपर्यंत मिरवणूक देखील काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *