ईव्हीएम हटाव…निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
म्हणत विरोधी पक्ष पुन्हा मैदानात
धुळ्यात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
धुळे शहर
महापलिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिन अर्थात मतदान यंत्रावर संशय व्यक्त करीत त्याविरुध्द सामुहिकपणे आवाज उठवायला सुरुवात केली आहे. गल्लीत ओळखत नाही असे असे उमेदवार भाजपच्या तिकीटावर ५-५ हजार मते घेतातच कशी? लोकांमध्ये महापालिकेच्या कारभारावर आणि पदाधिकार्यांविरुध्द प्रचंड रोष असतांना भाजपाचे ५० नगरसेवक पुन्हा निवडून आलीच कशी ? असे प्रश्न विचारत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतील पक्षांसह विरोधी पक्षांनी ईव्हीएम हटाव.. अशी मागणी करीत निवडणुका बॅलेट पेपर म्हणजेच मत पत्रिकेवर घ्या अशी जोरदार मागणी करण्यात आली.
विरोधी पक्षांनी धुळे जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे तर सामान्य मतदाराला सुध्दा अचंबित करणारे आहेत. ज्या प्रमाणे सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार, मंत्री निवडणुकीपूर्वीच भाजपाचे पन्नास प्लस नगरसेवक निवडून येतील असे छातीठोकपणे सांगतात व घडते देखील त्याप्रमाणेच. धुळे शहरात भाजपाचे पन्नास नगरसेवक निवडुन आले आहेत.ङ्ग अनेक प्रभागांमध्ये आम्ही यांना मतदानच केले नाही, मग हे निवडून कसे आले ? अशी चर्चा शहरात अनेक ठिकाणी घडते आहे.

सत्ताधारी भाजप पक्षाकडेच महापौर पद होते. प्रशासकाच्या माध्यमातून आमदार व पालकमंत्रीच महापालिकेचा कारभार करत होते. पण नागरिकांचे मुलभूत प्रश्न देखील सुटलेले नाहीत. नागरिकांना ८-८ दिवस पाणी मिळत नाही, कचर्याचे ढीग जागोजागी आढळतात. एक रस्ता धड नाही, सर्वत्र खड्डेच खड्डे दिसतात. वाहतुकीची कोंडीमुळे नागरिकांना अतोनात मानसिक त्रास होतो. महापालिका नगरसेवक, पदाधिकार्यांबद्दल तीव्र रोष, संताप नागरिकांमध्ये असतांना ५० नगरसेवक फक्त ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करुनच होवू शकतात, असे आता सामान्य नागरिक देखील बोलू लागले आहेत.
महापालिका निवडणुक निष्पक्ष,
भयमुक्त झाली नाही
काहीच काम न करणारे, प्रभागाला परिचित नसणार्या उमेदवारांनी ८ ते १० हजार मते घेतली आहेत. नगरसेवक ५-५ हजाराच्या मताधिक्यांनी निवडून आले आहेत. हे कसे शक्य आहे ? या निवडणुका मुळीच पारदर्शी व निष्पक्षपणे व भयमुक्त वातावरणात झाल्या नाहीत. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूका पारदर्शी होवूच शकत नाही, म्हणून जिल्ह्यातील किंबहुना संपूर्ण राज्यातील होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी आम्ही करीत आहोत.
कर्नाटकमध्ये मतपत्रिकांचा होणार वापर
कर्नाटक सरकारने नुकतेच सर्व निवडणूक बॅलेट पेपरने घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रातही सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन आज धुळे जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तसेच ईव्हीएम मध्ये करण्यात आलेल्या मत चोरी विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली तसेच राज्य शासनाचा व भारतीय निवडणूक आयोगाचा धिक्कार देखील केला.
याप्रसंगी धुळे शहरातील विरोधी पक्षाचे भगवान करणकाळ, साबीर शेख, रमेश श्रीखंडे, अतुल सोनवणे, सुनील नेरकर, नरेंद्र परदेशी, प्राची कुलकर्णी अजित राजपूत, एड. दुष्यंत देशमुख, धीरज पाटील, संतोष मिस्त्री, निंबा मराठे , प्रभादेवी परदेशी, सुरेश बैसाणे ,चंद्रमणी वाघ, सुरेश आण्णा लोंढे , मनोज बंब, आलोक रघुवंशी, शंकर खरात, जयश्री वानखेडे, संगीता जोशी ,अरुणा मोरे, सुनिता वाघ, सोनी सोनार, अण्णा फुलपगारे , प्रशांत ठाकूर, अनिल पाटील, संदीप सूर्यवंशी, सुभाष मराठे ,मुन्ना पठाण, सुरज भावसार,दिनेश पाटील, स्वप्निल लोंढे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, पंकज भारस्कर, सागर निकम, पिनू सूर्यवंशी, मुकेश भोकरे, आबा हरळ, वैभव पाटील सचिन शिंदे ,गुलाब धोबी, हिमांशू परदेशी, इशतियाक अन्सारी आदीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.