धुळे महापालिकेत शिवसेनेला महायुती म्हणून मान सन्मान देण्यास भाजप तयार ! ; आ.अनुप अग्रवाल यांचे सूतोवाच !!
धुळे शहर : Dhule city
धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप विरोधात लढले असले तरी आता महायुती म्हणून शिवसेनेला सोबत घेण्याची आणि योग्य तो मान सन्मान देण्याची तयारी भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दाखवली आहे. अर्थात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अथवा एमआयएम सोबत विरोधात जाण्यास तयार नसेल तरच हे शक्य होणार असेही भाजप नेत्यांकडून विशेषता आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून सूतोवाच करण्यात आले आहे.
आता शिवसेना यावर कोणती भूमिका घेणार आणि निवडणुकीआधी झाली नाही ती युती आता सत्ता स्थापने वेळी भाजपला पाठींबा देऊन साकार करणार की विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेणार ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
धुळे महापालिकेत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत आणि शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे धुळे महापालिका निवडणूक
भाजप सोबत महायुतीत एकत्र लढवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार मंजुळा गावित यांनी बोलणी सुरू केली होती मात्र जागा वाटपात चर्चा फिस्कटली आणि शिवसेनेने ३३ जागांवर निवडणुक लढवली यासाठी राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार पक्षासोबत आघाडी केली आणि काही ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत दिली.
निवडणूक आखाड्यात भाजप विरुध्द शिवसेना अशी जोरदार लढाई बघायला मिळाला. भाजपाशी शिवसेनेची अनेक प्रभागात थेट लढत झाली आणि त्यातून भाजपचे उमेदवार पडून ५ जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. आता निवडणुक संपली असून विजयी नगरसेवकांना आपल्या प्रभागात विकासाची आश्वासने पुर्ण करण्यासाठी आणि आवश्यक तो निधी मिळवण्यासाठी सत्ताधार्यांशी पर्यायाने भाजपशीच जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळेच शिवसेना आता सत्तेच्या बाजूने राहणार की विरोधात बसणार यावर खलबते होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवसेनेला सोबत घेऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे. अश्या वेळी भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आता शिवसेनेला सोबत घेण्याचे सूतोवाच केले आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांकडे आपली भूमिका मांडली आणि शिवसेनेला महायुती म्हणून सन्मान देण्यात येईल असे म्हटले आहे. अर्थात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अथवा एमआयएम सोबत विरोधात जाण्यास तयार नसेल तरच हे शक्य होणार असे ही स्पष्ट केले आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणे आणि काही पदे देण्यास मात्र भाजपला फारसे स्वारस्य नाही अशी भाजपाची भूमिका देखील मांडण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि निवडणूक आलेले 5 नगरसेवक काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.