धुळे शहर : Dhule city
महापालिका निवडणुक मतदानाला काही तास बाकी असतांना राजकीय राडेबाजीने धुळे शहर दणाणून गेले आहे. निवडणुकीचा अक्षरशः आखाडा झाला असून जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या भावाच्या घरावर झालेल्या हल्याने शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला आहे. एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी शेकडो मतदान कार्ड पकडून देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर ठाकरे सेनेच्या उमेदवाराने आचारसंहिता भंगची तक्रार दाखल केली आहे.
धुळ्याचे वातावरण यामुळे चांगलेच तापले आहे. मतदाना आधी ही परिस्थिती आहे तर उद्या प्रत्यक्ष मतदानावेळी काय काय होणार? कायदा सुव्यवस्था टिकणार की अजून मोठ्या भानगडी होणार असे प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

प्रभाग 2 मध्ये सेना उमेदवाराच्या
घरावर हल्ला; भाजपवर निशाणा
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असताना मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांचे पुतणे ऋषिकेश पाटील यांच्या घरावर अचानक दगडफेक करण्यात आली असून, घरासमोर ठेवलेल्या खुर्च्या व साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजपच्या उमेदवारासह काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांनीच हल्ला केल्याचा दावा मनोज मोरे यांनी केला आहे. मात्र, या आरोपांबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार मंजुळा गावीत या घटनास्थळी पोहोचल्या आणि आवश्यक ती माहिती त्यांनी घेतली.
प्रभाग 4 मध्ये शेकडो मतदार
ओळखपत्र सापडल्याने खळबळ

धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये शेकडोच्या संख्येने मतदार ओळखपत्र मिळून आल्याने ती खळबळ उडाली आहे. ही सर्व ओळखपत्र बोगस मतदान करण्यासाठी वापरली जाण्याचा संशय व्यक्त करीत एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
धुळे शहरात देवपुर भगत एका बॉक्स मध्ये सुमारे 500 मतदार ओळखपत्र मिळून आली. ही सर्व ओळखपत्र ताब्यात घेऊन एम आय एम पक्षाचे स्थानिक नेते इर्शाद जहागीरदार यांनी निवडणूक अधिकारी कापडणीस यांच्या कडे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग चार मधील उमेदवारांकडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप केला. ही सर्व मतदार ओळखपत्र वापरून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न होता, याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.