हवे तर ‘नोटा’चा पर्याय वापरा ; मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदान टाळू नका : अनिल गोटे यांचे आवाहन

 

धुळे शहर : Dhule city

धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदान करावे. कुणालाही मतदान करायचे नसेल तर ‘नोटा’चा पर्याय वापरावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदान टाळू नये, असे आवाहन शिवसेनेचे नेते व माजी आ.अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान शहरात गुंडगिरी, पैशांचा सर्रास वापर, दडपशाही तसेच हत्यारांचा वावर वाढल्याचा आरोप त्यांनी केला. अशा समाजविघातक प्रवृत्तींचा सामान्य मतदार खाजगीत विरोध करीत असला, तरी उघडपणे पुढे येण्यास भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले. परिस्थिती गंभीर असली तरी अजून पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत, केवळ धार्मिक भावनांच्या आधारे विकास होत नाही, असा दावा त्यांनी केला. बेरोजगार तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या ठोस योजना नसताना मोफत योजनांच्या माध्यमातून जनतेला गुंतवून ठेवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. अशा योजनांमुळे स्वाभिमानी जीवनाऐवजी अवलंबित्व निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बेरोजगारीमुळे शहरात तरुणांचे गट वाढत असून, विकासाचा अभाव आणि दिशाहीन राजकारणामुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचा आरोप गोटे यांनी केला. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण करून त्याचा फायदा घेत असल्याचा दावाही त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणूक ही शहराच्या भवितव्यासाठी महत्त्वाची संधी असून मतदारांनी सत्ताधारी पक्ष तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मित्रपक्षांना दिलेले मत हे प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षालाच दिलेले मत ठरेल, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले असून ते कोणत्याही प्रलोभनाला, दडपशाहीला किंवा गुंडगिरीला बळी न पडता निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा नसून मतदारांनी त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *