लोककल्याण
आपली मुलं भूक लागली म्हणाली की आजच्या मम्मी “दोन मिनीट” म्हणत झटपट बनवतात आपल्या बाळांच्या आवडीचे ‘नूडल्स’..!
नुडल्स एक असे फास्टफूड जे आता तर बऱ्याच जणांच्या महिन्याच्या राशन यादीत येते, डी मार्ट, किराणा मध्ये सहज उपलब्धता आणि लगेच बनणारा नाष्टा म्हणून तुम्ही देखील हे नूडल्स खाताय? तर आधी या आपल्या लाडक्या नूडल्स मॅगीमध्ये नेमक काय आहे? हे थोड जाणून घ्या!
बाजारात मिळणाऱ्या जवळपास सर्वच नूडल्स च्या एका पॅकेटमध्ये दोन प्रमुख भाग असतात – नूडल्स आणि मसाला पाउडर (टेस्टमेकर). दोन्हींच्या घटकांचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात.
सर्वप्रथम हे न्युडल्स कशाचे बनतात हे समजून घ्या.
१. मैदा (रिफाइंड गहू पीठ) – ८०-८५%
तर हे नूडल्स बनवण्यासाठी मैद्याचा वापर होतो, जो अत्यंत प्रक्रिया केलेला असतो. त्यामुळे त्यातील फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी प्रमाणात राहतात. मैद्याचे जास्त सेवन केल्यास पचनसंस्था बिघडू शकते, रक्तातील साखर वाढू शकते, आणि लठ्ठपणा मधुमेह धोका वाढतो.
२. पाम तेल – १०-१५%
नूडल्स तळण्यासाठी पाम तेलाचा वापर होतो. हे तेल स्वस्त आणि टिकाऊ असले तरी त्यातील संतृप्त चरबीमुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
पाम तेल कोणत्या क्वालिटीचे आहे आणि ते कितीवेळा वापरले जाते हे कंपनी पॅकेट वर कधीच सांगत नाही.
३. मीठ आणि सोडियम पॉलीफॉस्फेट – १-२%
नूडल्स टिकवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी सोडियमयुक्त पदार्थ वापरले जातात. अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकार तसेच किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.
नूडल्स मसाला
१. मसाले (धणे, जिरे, हळद इ.) – ३०-४०%
मसाल्यांमध्ये काही पोषक तत्त्वे असतात, पण ते प्रमाण कमी
२. मीठ – २०-२५%
एका पॅकेटमध्ये १०००-१२०० मिग्रॅ सोडियम असते, जे WHO च्या दैनंदिन मर्यादेपेक्षा जास्त आहे. जास्त मीठ खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
साखर – ५-१०%
मॅगीच्या चव संतुलित करण्यासाठी साखर वापरली जाते, जी आरोग्यासाठी अनावश्यक आहे.
एका नूडल्स पॅकेटमध्ये –
✔ ३००-३६० कॅलरीज
✔ १४ ग्रॅम चरबी (मुख्यतः पाम तेल)
✔ ४७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स (मैद्यामुळे)
✔ फक्त ७ ग्रॅम प्रथिने
यात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स फारच कमी प्रमाणात असतात, त्यामुळे हे संतुलित आहार म्हणून ग्राह्य धरता येत नाही
मॅगी नूडल्स हे पटकन बनणारे आणि चविष्ट खाद्यपदार्थ असले, पण त्यातील रिफाइंड पीठ, पाम तेल आणि जास्त सोडियम मानवी शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे विचार करूनच
“दोन मिनीट” म्हणत झटपट आपल्या बाळांच्या आवडीची ‘नूडल्स’ बनवून देतांना नक्की विचार करा..!