प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते  धुळ्यात भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ

धुळे जिल्हा
धुळे महापालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी सांयकाळी शहरातील कान्हदेश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरादेवी मातेच्या मंदिरात १०१ श्रीफळ वाढवून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपच्या सर्व ५९ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, अशी साद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज धुळेकरांना घातली.
यावेळी जाहीर सभा झाली, याप्रसंगी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार अनुपभय्या अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते. भाजपचे निवडणूक रिंगणातील सर्व ५९ उमेदवारांसह त्यांचे समर्थक व महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सभेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, की २०१४ पासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. त्यानुसार धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विकसित, स्मार्ट आणि स्वच्छ धुळे बनविण्यासाठी आपण सर्व शहरवासीयांनी महापालिकेतही भाजपची सत्ता आणायची आहे.  धुळे शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून घरांमध्ये शिरणारे पाणी आणि त्यातून होणारे नुकसान थांबविण्यासाठी ५१३ कोटींची स्टॉर्म वॉटर योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू. याशिवाय धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जीर्ण झालेली तापी योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी २२३ कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध राहू. जनसुविधेच्या प्रत्येक कामाला गती देण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. त्यासाठी तुमची आमची-भाजपा सर्वांची हा नारा घरोघरी पोहोचवा. पक्षाच्या संघटनात्मक ताकदीतून आपण महापालिकेच्या निवडणुकीत ५५ पेक्षा जास्त जागांवर विजय निश्चित साकारू, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आगामी पाच वर्षांतील विकासाचे व्हीजन मांडत त्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेच्या प्रारंभी महापालिका निवडणुकीसाठी पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हीजन मांडणाऱ्या जाहीरनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *