‘रन फॉर युनिटी २०२५’ उपक्रमांतर्गत धुळ्यात
एकता आणि जनजागृती रॅली
धुळे जिल्हा
राष्ट्राच्या एकतेचा, देशभक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणारा ‘रन फॉर युनिटी २०२५’ हा उपक्रम आज देशभर साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्लॅटफॉर्मद्वारे या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला. या रॅलीदरम्यान महिलांवरील अत्याचार, सायबर जागरूकता, नार्कोटिक्स प्रतिबंध, पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक विषयांवरील जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला.
‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून युवक-युवती, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी नागरिकांनी एक भारत, श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दुमदुमवला.
या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि समाजातील एकजूट वाढविणे असा असून, सरदार पटेल यांच्या विचारांना अभिवादन करण्याचा हा प्रतीकात्मक प्रयत्न ठरला.
रॅलीचे आयोजन स्थानिक प्रशासन आणि क्रीडा विभागाच्या सहकार्याने करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले.