धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील दुग्रम भागात सर्रासपणे चालणारी बनावट दारु निर्मिती आणि त्यासाठी वापरले जाणारे घातक स्पिरीट रसायन याची तस्करी करणार्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दहिवद शिवारात मोठा दणका दिला. यात महत्वाची भुमिका बजावली ती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहुल यांना मिळालेल्या परफेक्ट ‘टिप’ने ! उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चोख कामगिरी बजावली आणि १२ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करीत तिन जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात बनावट दारु बनवण्यासाठी उपयोगात येणार्या स्पिरिट भरलेले ड्रम एका वाहनातून दुसर्या वाहनात भरीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत वाहनांसह १२ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात, दहिवद शिवारातून स्पिरिटची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने दि.२ रोजी रात्री दहिवद शिवारातील दोधेश्वर फ्युल कंपनीनजीक सापळा लावला. मध्यरात्रीनंतर
तेथे दोन बोलेरो पीकअप दाखल झाले. त्यापैकी विना नंबरच्या बोलेरो पीकअपमधून दुसर्या बोलेरो (एमएच ०४/ बीयू-९५८३) मध्ये स्पिरिटचे ड्रम भरले जात होते. त्याचवेळी पथकाने छापा टाकला.
घटनास्थळावरुन दोन बोलेरो पीकअपसह ८ निळ्या रंगाच्या प्लॅस्टीक ड्रममध्ये २ हजार लीटर स्पिरिट असा एकूण १२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली.
बबलू पंढरीनाथ गोपाळ (३५) रा.मांडळ, अशोक गिरधर तिरमले (४७) रा.विखुरले ता. शिंदखेडा व कमल दुर्गा हरीचंद्र (२४) रा. कुकड्या खेडा जि. बडवानी ह.मु. शिरपूर अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमचे कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक ए.सी. मानकर, बी.एस. चौथवे, जवान के.एम. गोसावी, केतन जाधव, प्रतीकेश भामरे, वाहन चालक रवींद्र देसले यांच्या पथकाने केली.