खेळाडूंच्या यशात शिक्षकांसह पालकांचाही मोलाचा वाटा : आमदार अग्रवाल
धुळे जिल्ह्यातील शंभरावर खेळाडू- शिक्षकांचा नमो आदर्श क्रीडा पुरस्काराने गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यांतर्गत भाजपतर्फे उपक्रम
धुळे शहर
कुठल्याही क्रीडा प्रकारातील खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून आपल्यासह आपल्या गावाचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत असतो. या खेळाडूंची स्वतःची मेहनत, जिद्दीबरोबरच त्यांच्या यशात त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षकांचा वाटाही मोलाचा असतो. याचबरोबर या खेळाडूंचे पालक आणि कुटंबीयांचा त्याग, त्यांचे प्रोत्साहनही कारणीभूत ठरते. यामुळेच खेळाडू गौरवाला पात्र ठरतात, असे प्रतिपादन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगर कार्यकारिणीतर्फे १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवड्याचा उपक्रम होत आहे. याअंतर्गत मालेगाव रोडवरील आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या क्रीडापटूंसह क्रीडा शिक्षक, क्रीडा संचालकांचा नमो आदर्श क्रीडापटू व नमो आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कारासह स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. प्रारंभी मारुतीरायाच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
व्यासपीठावर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते भीमसिंह राजपूत, हिरामण गवळी, प्रा. रवींद्र निकम, माजी उपमहापौर भगवान गवळी, भिकन वराडे, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, भाजपच्या महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा आरती पवार, प्रा. विजय पाटील, चेतन गवळी, भाजपचे क्रीडा आघाडीचे संयोजक प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा. डॉ. भूपेंद्र मालपुरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ५५ खेळाडू आणि ५१ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आमदार अग्रवाल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत भारताची कामगिरी दखलपात्र ठरत आहे. यातून भारत प्रगतीच्या दिशेने झेप घेत आहे. यामध्ये मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान मोदींच्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत. किंबहुना यामुळेच आपण आज महासत्ता बनण्याकडे यशस्वी वाटचाल करत आहोत. भारताची ही वाटचाल अनेक विकसित राष्ट्रांना अडचणीची ठरत आहे. यामुळेच अमेरिकेसारख्या देशांकडून भारतावर अवाजवी टेरिफ, एचवन बी व्हिसाच्या धोरणात बदल आदींच्या माध्यमातून भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच काळाची पावले ओळखत स्वदेशीचा जागर करत देशवासीयांना आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले होते. यापुढे स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि त्याचा वापर हाच भारताच्या विकासातील केंद्रबिंदू ठरणार आहे. भारत हा युवकांचा देश आहे. ही युवा शक्तीच भारताला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. यामुळे आपले टॅलेंट आपल्या देशाच्या विकासासाठी वापरा, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले. तसेच सत्कारार्थी सर्व खेळाडू, क्रीडाशिक्षक आणि पालकांचे अभिनंदनही केले.
भिकन वराडे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे महानगर उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महानगर सरचिटणीस शशी मोगलाईकर, पवन जाजू, भाजयुमोचे अध्यक्ष वआकाश परदेशी, चेतन गवळी, प्रा. विजय पाटील, प्रा. भूपेंद्र मालपुरे आदींनी संयोजन केले.