धुळे – पुणे रेल्वे आणि मालेगाव रोड उड्डाणपूलसाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची मुंबईत रेल्वे व्यवस्थापकांशी महत्त्वपूर्ण बैठक

धुळे पुणे रेल्वे आणि मालेगाव रोडवरील उड्डाणपूलासाठी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या संघर्षाला मिळणार मोठे यश..!

• धुळे – पुणे रेल्वे आणि मालेगाव रोड उड्डाणपूलसाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची मुंबईत रेल्वे व्यवस्थापकांशी महत्त्वपूर्ण बैठक..!

मुंबई

धुळे शहरात सुरु असणारी धुळे ते पुणे हि रेल्वे कोविड- १९ काळात अचानक थांबवण्यात आलेली धुळे – पुणे रेल्वे सेवा अद्यापही पूर्ववत सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, धुळे जिल्ह्यातील हजारो प्रवासी, विशेषतः शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांस्तव पुण्याकडे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सेवेच्या अभावामुळे अनेकांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पातळीवरही फटका बसत आहे.याच पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी या समस्येची गंभीर दखल घेत, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनासोबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या प्रयत्नांना आता यश प्राप्त होतांना दिसत आहे.

मुख्य व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी बैठक
काल खासदार डॉ. बच्छाव यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन धुळे-पुणे रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत त्यांनी नागरिकांच्या भावना आणि या रेल्वे सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. या चर्चेदरम्यान लवकरच ही रेल्वे सेवा स्वतंत्रपणे सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्प व जमीन अधिग्रहणाचा आढावा
या बैठकीत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पाचा देखील आढावा घेण्यात आला. यासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे अधिग्रहण लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संसदेपासून नागपूर मुबई पर्यंत पाठपुरावा
९ डिसेंबर २०२४ रोजी, दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरू असताना डॉ. बच्छाव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन धुळे-पुणे आणि धुळे-मुंबई या दोन्ही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. तसेच, मालेगाव रोडवरील रेल्वे गेट क्रमांक २२ येथे रेल्वे उड्डाणपूल (ROB)बांधण्यात यावा, अशीही ठाम मागणी त्यांनी केली होती.१६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन या मागण्यांचा पुनरुच्चार केला. त्यानंतर रेल्वेचे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी काल मुंबई येथे आढावा बैठक घेत धुळे पुणे रेल्वे हे सुरू करणे गरजेचे असून त्यांच्या लक्षात आणून देत येणाऱ्या काळात लवकरात सुरू करण्यात येईल असे ठोस आश्वासन मीना यांनी खासदार बच्छाव यांना दिले.

मालेगाव रोड उड्डाणपूल आणि मोहाडी स्थानकाच्या विकासासाठी ठोस पावले
१० एप्रिल २०२५ रोजी मुंबई आणि २३ मे २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत डॉ. बच्छाव यांनी पुन्हा एकदा आपली बाजू ठामपणे मांडली. यानुसार, मालेगाव रोड ROB व मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाच्या पायाभूत सुविधा समितीकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना लवकरच अंतिम मंजुरी मिळणार आहे.

संघर्षाला मिळतेय यशाची दिशा
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी अनेक वेळा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, जनरल मँनेजर व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्यासोबत देखील या विषयावर चर्चा केली असून, त्या माध्यमातून विविध प्रस्ताव आणि बैठकीद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणून धुळेकरांना लवकरच ही अत्यंत आवश्यक रेल्वे सेवा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *