धुळे जिल्हा
जुना आग्रारोडवर पुन्हा व्यवसायाची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत किरकोळ व्यावसायीक फेरीवाल्यांनी सहकुटुंब उपोषण सुरु केले असून आज उपोषणाच्या दुसर्या दिवशी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी श्राध्द घालत मुंडन करुन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मनपाच्या नावाने विलाप केला.
धुळे शहरातील आग्रारोड सोडून जेबी रोड आणि भांडे बाजारासह पेठ भागातीलच अन्य गल्लीबोळात व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असली, तरी नव्या ठिकाणी अपेक्षित मिळकत होत नसल्याने पथारी आणि अन्य व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असल्याने ते मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे शहरातील क्युमाईन क्लब समोर सर्व व्यावसायिक आपल्या कुटूंबीयांसह लहान लहान बालकांसह उपोषणाला बसले आहेत.
शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या आग्रा रोडवर रोज तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय थाटणार्या विक्रेत्यांपैकी बहुतेकांनी वेगवेगळ्या बँकांचे कर्ज,बचत गट,खाजगी सावकार किंवा व्यापार्यांकडून उधारीवर खरेदी केलेला माल यामुळे कर्ज झाले आहे. याशिवाय अनेक संकटाना ते तोंड देत आहेत. त्यात व्यवसायाचे नव्हे आव्हान समोर उभे ठाकल्याने अनेक विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाकडे हॉकर्सच्या मागण्यासंदर्भात कुठलेही योग्य पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याचेच हे द्योतक आहे. व्यवस्था किंवा नियोजन नसताना केवळ वेळकाढू धोरणाने हा प्रश्न भिजत घोंगडे ठरला आहे. या पार्श्वभूमीवर हॉकर्सच्या अडचणी समजावून घेवून तात्काळ मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा आंदोलनात सामिल विक्रेत्यांनी केली.
यावेळी रवि वाघ,सागर निकम,पुनीत वराडे, ज्योती सोनवणे,महेश चौधरी,अमोलगवांदे,मुस्ताक अन्सारी, राहुल माळी,रवी थोरात,नितीन वराडे,अमोल शिरसाठ,अन्वर अन्सारी, सलीम खाटीक आदी उपस्थित होते.