मराठ्यांनी गुलाल उधळला ! जरांगे पाटलांच्या उपोषणाची विजयी सांगता !! हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी

मुंबई

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केल्यानंतर अखेर पाच दिवस मुंबईत सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे, मंत्रिमंडळाचे आभार मानले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावं, तुमचं आमचं वैर संपलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारपुढे अट ठेवली आहे. तुम्ही या, नका येऊ आमची ही विनंती आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. त्यावर, आपण हे उपोषण आज उपोषण मागे घ्यावे, नंतर आपण मुख्यमंत्र्‍यांसमवेत भेटूया असे मंत्री विखे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मदत केली, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोय, ह्या मागण्या मान्य करू शकलो असे विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळातच विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन आपले उपोषण सोडले.

आमचं म्हणणं एवढचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा आणि आमच्या मराठ्यांमध्ये एक कटुता आहे, ते जर इथं आले तर ती कटुता संपुष्टात येईल पण ते आले नाहीत तर ही कटुता कायम राहिल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांना बोलावले होते. मात्र, विखे पाटलांच्या विनंतीनंतर अखेर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख असल्याने मलाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिले आहेत, त्यामुळे आपण उपोषण सोडावं अशी विनंती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. तसेच, दमानं गाड्या चालवा म्हणत मुंबईतून आता गावाकडं जायचंय, घरी निघायचं असे आवाहनही केले.

 जरांगे पाटलांच्या मागण्याचे शासन निर्णय जारी

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने आज मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी मागितला आहे. तर इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार, अखेर शासनाने हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *